- दीपक ढोले जालना - जालना येथील एचडीएफसी बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंठा शहरातील जुन्या जगदंबा जिनिंगच्या मैदानात शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रदीप भाऊराव कायंदे (४० रा. उंबरखेड, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
प्रदीप कायंदे हे जालना येथील एका कंपनीमार्फत एचडीएफसी बँकेत वसुली अधिकारी म्हणून नोकरीला होते. त्यांना वसुलीसाठी देऊळगाव राजा व सिंदखेड राजा हे कार्यक्षेत्र देण्यात आले होते. शनिवारी सकाळी मंठा शहरातील जुन्या जगदंबा जिनिंगच्या मैदानावर नागरिकांना एक मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती मंठा पोलिसांना दिली. माहिती मिळताच, मंठा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मयताचे खिसे तपासले असता, त्यात कागदपत्रे दिसून आली. नंतर मयताची ओळख पटली. दरम्यान, प्रदीप कायंदे यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. याची माहिती मयताच्या नातेवाइकांना देण्यात आली. या प्रकरणी मयताचे भाऊ सतीश भाऊराव कायंदे यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळाला डीवायएसपींची भेटघटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत, आसमान शिंदे, पोका. शाम गायके, केशव चव्हाण, दीपक आढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.