जालना मतदार संघातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना पराभवाला सामोरे लागले आहे. त्यांना कॉंग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी २५३४८ मतांनी पराभूत केले. अर्जून खोतकर यांना ६६४९७ मते मिळाली तर कैलास गोरंट्याल यांना निर्णायक ९१८३५ मते मिळाली.
२०१४ प्रमाणे याही निवडणुकीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यात चुरशीचा सामना झाला. राजकीय इतिहास पाहाता, या मतदारसंघात कॉँग्रेस आणि शिवसेनेतच लढत झाली आहे. यामुळे दोन्ही उमेदवारांना मतदारसंघाचा पुरेपूर अभ्यास आहे. खोतकर यांच्याकडे राज्यमंत्री पद असल्याने आणि ग्रामीण भागात वाढता संपर्क असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, मागच्या पराभवाने खचून न जाता गोरंट्याल यांनी मतदारसंघाची बांधणी केली. तसेच त्यांचे अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याने जालना शहरातील व्यापारी वर्ग त्यांच्याकडे वळला. राज्यमंत्री असल्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खोतकर यांचा वरचष्मा होता. यामुळे त्यांच्या विरोधात काही प्रमाणात राजकीय खदखद होती. तसेच भाजपने मतदारसंघात मनापासून काम केले नसल्याचा फटका खोतकर यांना बसल्याची चर्चा आहे.