जाफराबाद (जालना ) : मानव विकासच्या बसमध्ये आज सकाळी महिला वाहक व्ही. एम. डहाळे यांनी शाळेत जाण्याऱ्या काही विद्यार्थिनींना अश्लीश भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी मेरखेडा येथून मानव विकासच्या बसमध्ये काही विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी चढल्या. यावेळी महिला वाहक व्ही. एम. डहाळे यांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी वाहकावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनीनी जाफराबाद पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी सविता शिवदास बोरकर, प्रतीक्षा संतोष देव्हडे, शितल विजय जाधव, पूजा राजू जाधव यांनी पोलीस निरीक्षक एस. पी. खोपडे यांना निवेदन दिले. तसेच याबाबत आगार प्रमुखांना कारवाई करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. घडलेल्या प्रकारची चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली.