लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघामध्ये कडक उन्हातही मतदारांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. जालना शहरात मात्र, पाहिजे तेवढा उत्साह नसल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार (अंदाजित) लोकसभा मतदार संघात ६४.५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे दिसून आले. जवळपास ३१ ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता.एकूणच सकाळी काही मतदान केंद्रावर अत्यंत उत्साही वातावरण तर काही ठिकाणी मतदारांचा किरकोळ प्रतिसाद दिसून आला. मतदारांना आणण्यासाठी राजकीय पक्षांकडून रिक्षा तसेच अन्य वाहनांचा वापर केला गेला. काही ठिकाणी ईव्हीएम सुरू होण्यास विलंब झाला. त्यात उर्दू हायस्कूल येथील १८२ बुथ क्रमांकावर ही अडचण आली होती. तर सरस्वती भुवन मतदान केंद्रावर मतदार याद्यांतील नावे सापडताना मतदारांची दमछाक झाली. शहरात विशेष करून युवतींमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सेल्फी पॉर्इंटमुळे अनेकांनी मतदान केल्यावर स्वत:चे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले.शहरातील काही मतदान केंद्रांवर किरकोळ स्वरूपाचे वादही झाले. परंतु वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करून हे वाद सोडवले. काही ठिकाणी मोबाईल नेण्याच्या मुद्यावरून वाद झाला असून, अंबड येथे एका युवकाने मतदान यंत्राचा फोटो काढून तो शेअर केल्याने त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण, बदनापूर, सिल्लोड, फुलंब्री, भोकरदन येथे मतदारांनी भरभरून मतदान केल्याने मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे, हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे.
जालना : ६४.५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:10 AM