परतूरः जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात सुशिक्षित बेरोजगार आम आदमी पक्षाचे उमेदवार संतोष मगर यांनी 100 रुपयांच्या बॉण्डवर आगळावेगळा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. निवडणुकीत अनेक उमेदवार जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडून येतात व निवडून आल्यानंतर दिलेली वचने विसरतात.तसेच मतदारसुद्धा उमेदवार यांनी दिलेली आश्वासने विसरून जातात. पण परतूर मंठामधून मी आम आदमी पार्टीचा उमेदवार संतोषकुमार आनंदा मगर निवडणूक लढवत आहे. माझा निवडणूक जाहीरनामा बॉण्डवर नोटरी करून जनतेला देत आहे, जर ते पूर्ण न केल्यास मी जनतेला माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार देत आहे. अशा जाहीरनाम्यामुळे आम आदमी पक्षाचे नेते उमेदवार संतोष मगर चर्चेत आले आहेत. तसेच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास नागरिकांना याेग्य ती कारवाई करण्याचा अधिकार देखील त्यांनी मतदारांना दिला आहे. विधानसभेच्या निवडणुका येत्या 21 ऑक्टाेबर राेजी हाेत आहेत. त्यासाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.निवडणुकीच्या वेळी विविध राजकीय पक्ष तसेच उमेदवार मतदारांना माेठमाेठी आश्वासने देत असतात. परंतु अनेकदा ती आश्वासने निवडणुकांपूर्तीच मर्यादित राहतात. निवडणुका झाल्यावर त्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे नेते केवळ आश्वासने देतात परंतु त्याची पूर्तता करत नाहीत, असा समज मतदारांमध्ये झालेला असताे. हा समज खाेडून काढण्यासाठी मगर यांनी थेट आपला जाहीरनामा शपथपत्रावर लिहून दिला आहे. या जाहीरनाम्यात त्यांनी विविध 11 आश्वासने दिली आहेत. निवडून आल्यावर ती पूर्ण न केल्यास फसवणूक केल्याची कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार त्यांनी मतदारांना दिला आहे.
याबाबत लाेकमतशी बाेलताना मगर म्हणाले, बऱ्याच लाेकांकडून ऐकले हाेते की उमेदवार आश्वासने देतात परंतु ती पूर्ण करत नाहीत. मतदारांचा देखील तसा समज झालेला असताे. एखाद्या उमेदवाराने प्रामाणिक भावनेतून आश्वासने दिली असतील तर त्याने ती मतदारांना लिहून देण्यास काहीही हरकत नाही. मी दिलेली आश्वासने निवडूण आल्यास मी शंभर टक्के पूर्ण करणार आहे. अन्यथा मतदारांना माझ्यावर फसवणुकीची कारवाई करण्याचा अधिकार मी दिला आहे.