जालना विधानसभेत पुन्हा एकदा महाविद्यालयीन मित्रांमध्ये रंगणार सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:30 AM2019-09-25T00:30:18+5:302019-09-25T00:30:45+5:30
जालना विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या विरूद्ध माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी षड्डू ठोकला आहे
जालना : विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. दोन दिवसात खऱ्या अर्थाने या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यातच जालना विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या विरूद्ध माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी षड्डू ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या या लढाईत कोण कोणाला आस्मान दाखवेल, ते २४ आॅक्टोबरला कळेल....
नागरिकांच्या भावनांना प्राधान्य देणार - खोतकर
जालना : शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात महाविद्यालयीन काळातच एन्ट्री केली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे युवकांवर एक प्रकारे गारूड होते. या वलयामध्ये आपणही आपोआप गुंतले गेलो. वयाच्या २६ व्या वर्षी आमदार होण्याचे भाग्य केवळ शिवसेनेमुळेच लाभले.
एकूणच आपला परिवार हा वारकरी परिवार असल्याने सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालण्याचा शिवसेनेचा बाणा मला राजकारणातही कामी आला. महाविद्यालयीन काळातच निवडणुकीत उडी घेतली आणि नंतर राजकारणात रमलो. त्याला आज ३० वर्षे होत आहेत. या कालावधीत अनेक चढ-उतार पाहिले. परंतु, शिवसेनेशी निष्ठा आणि लोकांशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. विकास कामे खेचून आणण्यासाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेतली. तर जालन्यातील काही योजना विशेष करून जायकवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. राजकारण करत असताना सर्वांना सोबत घेऊन ते आपण करीत असल्याने आजपर्यंत यशस्वीपणे टिकलो. जनतेच्या भावनांना नेहमीच प्राधान्य देण्याचे काम आपण केले आहे. जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होऊन त्यांना आपण राजकीय नेतेच नव्हे तर ख-या अर्थाने जी पदवी आपल्याला ‘भाऊ’ दिली आहे, त्या शब्दाच्या अर्थाला जागणारे आपण आहोत. यापूर्वीही जालना जिल्ह्याच्या विविध विकास कामांमध्ये कधी राजकारण आणले नाही. समाज हिताला प्राधान्य दिले. शिवसेनेचे नेते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि त्यात यशही आले. ते केवळ जनतेच्या पाठिंब्यामुळेच. यंदाची ही आपली सातवी निवडणूक आहे. त्यात महाविद्यालयीन काळात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेलेच आम्ही पुन्हा एकदा सक्रिय राजकारणातही आमने सामने आलो आहोत. त्यामुळे आता जनता नेमका न्याय कोणाला देते हे पाहणे लक्षणीय ठरेल. परंतु, असे असले तरी आपण नेहमीच जनतेत राहून राजकारण केल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील जनता आपल्या पाठीशी पुन्हा एकदा भक्कमपणे उभी राहील, यात शंका नाही.
थेट योजना आणून विकास साधण्यावर भर- गोरंट्याल
जालना : राजकारणाचे बाळकडू हे आपल्याला घरातूनच मिळाले आहे. चुलते जालन्याचे नगराध्यक्ष होते. त्यामुळे आम्ही देखील त्या काळात विद्यार्थी दशेत त्यांच्यासोबत राहिलो. नागरिकांमध्ये राहताना राजकारण आणि समाजकारण कसे करावे, याचे धडे मला मिळाले. यातूनच आपले नेतृत्व विकसित होत गेले.
महाविद्यालयीन काळातही आपली एक स्वतंत्र प्रतिमा होती. ती आजही कायम आहे. स्पष्टवक्तेपणा आणि एखादे काम खºया अर्थाने शक्य होत असेल तरच त्याचे आश्वासन देणे हा आपला स्वभाव आहे. केवळ गोड बोलून वेळ मारून नेणे आपण यापूर्वीही महत्त्व दिले नाही आणि पुढेही ते देणार नाही. नगर पालिकेतून खºया अर्थाने आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झाला. ही कारकीर्द कमी- अधिक प्रमाणात यशापयश देऊन गेली. त्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. बाळासाहेब पवार, माजी खासदार अंकुशराव टोपे यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. नगर पालिकेतील वेगवेगळ्या विषयांमध्ये रस निर्माण होऊन आपण जालन्याचे नगराध्यक्षपदही उपभोगले. या काळात शहराची गल्ली न गल्ली माहिती असून, तेथील कोणकोणत्या समस्या आहेत, याची जाण आहे. त्यामुळेच या समस्या एखाद्या जादूच्या कांडीप्रमाणे सुटणाºया नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्याने त्या आपण सोडविण्यावर भर दिला. विधानसभेत जाण्याची संधी काँग्रेसकडून मिळाल्यानंतर त्याचे आपण सोनं केले. जालना शहर हे व्यापारी आणि उद्योजकांचे शहर म्हणून ओळखले जाते. आपलाही परिवार हा याच क्षेत्रातून पुढे आल्याने समस्या माहिती होत्या. २०१० मध्ये दुष्काळ तीव्र झाल्याने पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात शहराला बसू लागली. त्यासाठी पैठण- जालना ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाला या योजनेसाठी निधी देण्यासाठी राजी केले होते. त्यामुळे आज शहराला किमान पिण्याचे पाणी मिळत आहे. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक धोरणामुळे कुठल्याही एका जातीचा आपल्यावर शिक्का नाही. गेल्या निवडणुकीत थोड्या फरकाने आपला पराजय झाला होता. तो यंदा जनता विजयात रूपांतरित करेल, हा विश्वास आहे.