जालना : औरंगाबाद येथील महात्मा गांधी महाविद्यालयात व्हिजिओ पॉलिटेक-२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जालना येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्री हिटींग सिस्टीम या प्रोजेक्टने राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दुचाकीचे अॅव्हरेज वाढविण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त आहे.व्हिजिओ पॉलिटेक २०१८ मध्ये राज्यभरातून अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवून आपले प्रोजेक्ट सादर केले. यामध्ये जालना येथील मत्स्योदरी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी गौरव राजू घोडके, अक्षय दामोदर पोघाडे, गणेश कडूबा निकाळजे, अमन भरत गिरी यांनी टू व्हीलरचे अव्हरेज वाढविण्याचा प्रोजेक्ट सादर केला. प्रयोगासाठी काही तांत्रिक बदल केलेल्या मोपेडच्या सायलेन्सरला पत्रा व नळीद्वारे थेट इंजनला गरम हवा पुरवठा करून पेट्रोलची बचत व संपूर्ण पेट्रोल जळण्याचा हा प्रोजेक्ट होता. या प्रोजेक्टला राज्यातून द्वितीय पुरस्कार देण्यात आला आहे.याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले, की आम्ही मेकॅनिकल तृतीय वृर्षाचे शिक्षण घेत आहोत. या प्रयोगात आम्ही प्री-हिटींग इंजिन सिस्टीम मोपेड सारख्या कमी वजनाच्या व टू स्ट्रोक दुचाकीच्या सायलेन्सरला एका जाळीवर पत्रा व नळीद्वारे थेट इंजिनच्या कॉर्बोरेटरला गरम हवा पुरवठा केला. यामुळे वाहन धावतानाही इंजिनला त्याचा फायदा होतो. पेट्रोलचीही १० टक्के बचत होते. आम्ही लवकरच हा प्रोजेक्ट फोरस्ट्रोक इंजिनमध्ये विकसित करणार आहोत. या प्रोजेक्टला प्री हिटींग सिस्टीम असे नाव देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
व्हिजिओ पॉलिटेकमध्ये जालन्याचे नाव राज्य स्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:58 AM