जालना : बंदी असतांनाही प्लास्टिक साठवून ठेवणाऱ्या दोन ट्रान्सपोर्टवर छापा टाकून तब्बल तीन टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही कारवाई नगरपालिकेने आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील जुना मोंढा भागात केली. जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. याबाबत जनजागृती करण्यात आली. प्लास्टिक वापरू नये, या संदर्भात आवाहन करण्यात आले. त्यानंतर सर्व नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांना सुचना देवून प्लास्टिक बंदी संदर्भात कारवाया करण्यास सांगितले. त्यानंतर सर्वांनी कारवायांची मोहिम हाती घेतली. जालना नगरपालिकेनेही यापूर्वी अनेक कारवाया करून हजारोंचा दंड वसूल केलेला आहे. तरीही काही लोक छुप्या पध्दतीने प्लास्टिकचा वापर करत होते. पालिकेकडून वारंवार तपासणी करण्यात येते.
दरम्यान, आज मोंढा मार्केटमधील गिरीराज व जळगाव ट्रान्सपोर्टमध्ये प्लास्टिकचा साठा असल्याची माहिती पालिकेला मिळाली. त्याप्रमाणे मुख्याधिकारी संतोष खांडेकर हे स्वच्छता निरीक्षक नारायण बिटले व जॉन्सन कसबे यांच्यासह फौजफाटा घेवून ट्रान्सपोर्टवर पोहचले. छापा मारला असता त्याठिकाणी अंदाजे तीन टन प्लास्टिक मिळून आले. हे सर्व प्लास्टिक जप्त केले आहे. नगरपालिकेच्यावतीने त्यांच्याविरोधात कारवाईची नोंद करणे सुरू आहे. या मोठ्या कारवाईने प्लास्टिकचा साठा करणाऱ्यांची धाबे दणाणले आहेत.
आजही सर्रास वापरजालना नगरपालिकेने कारवाई केल्याने धाबे दणाणले असले तरी जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र आजही सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. अशीच कारवाई जिल्ह्यात इतर ठिकाणीही करणे गरजेचे आहे.