जालना : जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. १७ संचालक निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. सोमवार, १९ जूनपासून नामनिर्देशनपत्र विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. गरजेनुसार २३ जुलै रोजी मतदार प्रक्रिया होणार असून, यात ६९८ मतदार नवीन कारभारी निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
जालना जिल्हा बँकेच्या जिल्हाभरात ७४ शाखा असून, सभासद संख्या १,४९६ इतकी आहे. पीककर्जदार सभासद साडेसहा लाखांवर आहेत. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजांना पूर्ण करण्यासाठी जिल्हा बँक आघाडीवर होती. मध्यंतरी कर्ज वसुली अपेक्षित होत नसल्याने जिल्हा बँक आर्थिक डबघाईला आली होती. परंतु, बँकेतील त्या-त्या वेळच्या पदाधिकारी, संचालक मंडळासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गत काही वर्षात दैनंदिन कामाचे नियोजन करीत कर्जवसुलीवर भर दिला. त्यामुळे जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती गत काही वर्षात चांगलीच सुधारत आहे. गत काही वर्षात ही बँक आर्थिक नफ्यातही राहत आहे.
संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासकीय पातळीवरून जिल्हा बँकेची मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. प्राथमिक मतदार यादीत १,४९६ संस्था सभासदांपैकी केवळ ७१३ मतदारांची नावे आली. त्यातही आक्षेपांवरील सुनावणीनंतर आवसायनात निघालेल्या संस्था, नोंदणी रद्द झालेल्या संस्थांना वगळण्यात आले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ६९८ मतदारांची यादी अंतिम केली आहे. मतदारांची यादी अंतिम झाल्यानंतर १६ जून रोजी जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. निवडणूक प्रक्रिया जाहीर होताच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती गत काही वर्षात सुधारत आहे. या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडणूक होणार की मतदान होणार ? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक बिनविरोध होणार?आर्थिक डबघाईला आलेली जिल्हा बँक कात टाकत आहे. या पार्श्वभूमीवर बँकेची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे. परंतु, यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. बबनराव लोणीकर, बँकेचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुन खोतकर व इतर नेतेमंडळी कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशन पत्र विक्री आणि दाखल करणे १९ ते २३ जून नामनिर्देशनपत्र छाननी २६ जून विधी ग्राह्य नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिद्ध करणे २७ जून नामनिर्देशनपत्र मागे घेणे २७ जून ते ११ जुलै निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे १२ जुलै गरजेनुसार मतदान घेणे २३ जुलै मतमोजणी करून निकाल घोषित करणे २४ जुलै