विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्यासाठी २ हजार मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. यात आठ मतदान केंद्रे सखी तर सहा आदर्श मतदान केंद्र राहणार आहेत. या मतदान केंद्रावर ५६७३ पुरूष तर ५३२१ महिला मतदान करणार आहेत.जालना मतदार संघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. १८ लाख मतदार २ हजार मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत. मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास १५ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागातर्फे चार टप्प्यांत मतदान प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील आठ मतदान केंद्र यंदा प्रथमच महिलांच्या हाती देण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावर महिला कामकाज पाहणार आहेत. या मतदान केंद्राला सखी म्हणून असे नाव देण्यात आले आहे.तसेच सहा आदर्श मतदान केंद्रे ही राहणार आहेत. आठ सखी केंद्रांवर २९५१ पुरूष तर २७७२ महिला असे एकूण ५७२३ जण मतदान करणार आहेत. आदर्श मतदान केंद्रावर २७२२ पुरूष तर २५४९ महिला असे एकूण ५२७१ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत.आदर्श मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, रॅम व अन्य आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.दरम्यान, निवडणूक विभागाच्यावतीने सखी, महिला, दिव्यांगांसाठी या विशेष मतदान केंद्रांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी राजीव नंदकर यांनी दिली आहे.
जालना जिल्ह्यात आठ सखी मतदान केंदे्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 1:03 AM