जालना : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात २६.९५ मिमी पाऊस झाला. तर जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ शिवारातील रायघोळ नदीला गुरूवारी पूर आला होता. त्यामुळे सायंकाळी शेतातून घरी परतणाºया शेतकरी, महिलांनी मानवी साखळी करून पुरातील पाण्यातून वाट शोधली.
गत दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी वाहत असून, प्रकल्पातील पाणीपातळीतही समाधानकारक वाढ होत आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गुरूवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी २६.९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस अंबड तालुक्यातील वडीगोद्री महसूल मंडळात तब्बल १३६ मिमी झाला आहे. तर गोंदी मंडळात ९५ मिमी, जालना तालुक्यातील सेवली मंडळात ६८ मिमी, भोकरदन तालुक्यातील अन्वा मंडळात ८० मिमी, परतूर महसूल मंडळात ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय पिंपळगाव रेणुकाई मंडळात ४५ मिमी, केदारखेडा ४३ मिमी, पांगरी गोसावी ४५ मिमी पाऊस झाला आहे. इतर महसूल मंडळातही कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.
अंबड तालुक्यात सर्वाधिक पाऊसगत २४ तासात अंबड तालुक्यात सर्वाधिक ४५.४३ मिमी पाऊस झाला आहे. भोकरदन तालुक्यात ३९.१३ मिमी, परतूर तालुक्यात २७.२० मिमी, जाफराबाद तालुक्यात २३.४० मिमी, घनसावंगी तालुक्यात २१.८६ मिमी, जालना तालुक्यात २१.५० मिमी, बदनापूर तालुक्यात १९.८० मिमी तर मंठा तालुक्यात १७.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.