- संजय देशमुख
जालना : येथील दीपक हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय राख यांच्या बनावट सह्या करून नाशिक जिल्ह्यातील केजीएस शुगर इंफ्रा कॉर्पोरेशनने विविध तीन बँकांमधून ३२८ कोटींचे कर्ज उचलले होते. या प्रकरणाची सविस्तर माहिती इडी अर्थात इन्सफोर्समेंट डायरेक्टोरेट यांनी मागविल्याची माहिती सूत्रांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यात केजीएस शुगर इंफ्रा कॉर्पोरेशन या खासगी साखर कारखान्यामध्ये जालन्यातील डॉ. संजय राख हे संचालक होते. असे असताना संबंधित कारखान्यातील अन्य संचालकांनी कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसिस बँक या तीन बँकांमधून सन २०१४ मध्ये ३२८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीची थेट नोटीस डॉ. राख यांना २०१८ मध्ये प्राप्त झाल्याने डॉ. राख हे हवालदिल झाले. एवढ्या कर्ज प्रकरणाशी आपला संबंध नसताना वसुलीची नोटीस कशी आली या शंकेने ते त्रस्त झाले होते. अधिक माहिती घेतली असता, डॉ. राख यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचे बँकांकडून मागविलेल्या कागदपत्रांवरून दिसून आले. यासाठी डॉ. राख यांनी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून या सहीचा अहवाल मागविला. त्या अहवालानुसार डॉ. राख यांची बनावट सही कर्जाच्या दस्तऐवजांवर करण्यात आल्याचे उघड झाले.
यानंतर राख यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये तक्रार दिली होती. त्यात केजीएस शुगरचे संचालक दिनकर बोडखे, संचालक प्रल्हाद कराड, अनिल मिश्रा यांच्यासह देवाशिष मंडळ, मंजूषा बोडखे, लेखा परीक्षक महेश कोकाटे यासह बँकांमधील अन्य तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात राख यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला होता. त्यांनीदेखील यात तपास करून दिनकर बोडखे यांना अटकही केली होती. आता गेल्याच महिन्यात या सर्व प्रकरणाची माहिती इडीने मागविल्याने खळबळ उडाली आहे.