जालना लोकसभा; काँग्रेसची उमेदवार निश्चितीसाठी लगीनघाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:41 AM2019-03-19T00:41:56+5:302019-03-19T00:42:22+5:30
जालना जिल्हा काँग्रेस समितीने तातडीने बैठक घेऊन जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेस कडून कोण लढणार, ते नाव तातडीने सुचवावे, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्हा काँग्रेस समितीने तातडीने बैठक घेऊन जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेस कडून कोण लढणार, ते नाव तातडीने सुचवावे, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. हे निर्देश मिळताच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची लगीन घाई सुरू झाली. सोमवारी रात्री माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीस सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी मार्गदर्शन केले. बैठकीच्या अध्य्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते.
यावेळी आ. सत्तार म्हणाले की, काँग्रेसला पोषक वातावरण आहे. त्यामुळे सक्षम उमेदवार दिल्यास आपण दानवेंचा पराभव करू शकतो. मात्र, त्यासाठी सर्वानी एकत्रित येऊन नियोजन करणे गरजेचे आहे. दरम्यान कैलास गोरंट्याल यांनी सांगितले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवेंना पाचव्यांदा संधी न देण्यासाठी काँगे्रसने कंबर कसणे गरजेचे आहे. त्यांच्या तुल्यबळ उमेदवार देऊन त्यांना खिंडीत पकडता येणे शक्य आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्साहाने कामाला लागावे असे आवाहन केले.
बैठकीस विमलबाई आगलावे, आर.आर.खडके, भीमराव डोंगरे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तायडे तसेच डॉ. संजय लाखे पाटील, राजेंद्र राख, शेख महेमूद, नगरसेवक गणेश राऊत, वसंत जाधव, विजय चौधरी, राम सावंत, कृष्णा पडूळ, वैभव जाधव, दिनकर घेवंदे, महावीर ढक्का, शेख रौफ परसूवाले, संजय भगत, रमेश गौरक्षक आदींची उपस्थिती होती.