जालना : ७ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार जालना महानगर पालिका अस्तित्वात आली आहे. या 'ड' वर्गाच्या महानगर पालिकेचा कारभार अतिरिक्त आयुक्त पाहणार असून, ३४ संवर्गासाठी ४३ पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यास मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी शासन आदेशानुसार मान्यता देण्यात आली आहे. महापालिकेतील विविध विभागांना स्वतंत्र अधिकारी मिळणार असल्याने शहरातील मुलभूत सोयी-सुविधांचे प्रश्न वेळेत मार्गी लागण्याची आशा आहे.
गत काही वर्षापासून जालना महानगर पालिका निर्मितीबाबत शासनस्तरावरून प्रक्रिया सुरू होती. जालना महानगर पालिकेची निर्मिती व्हावी, यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शिवाय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. जालना महानगर पालिका निर्मितीबाबत सूचना, हरकती मागविण्यात आल्या होत्या. सूचना, हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी शासन आदेशानुसार जालना महानगर पालिका अस्तित्वात आली होती. महानगर पालिका अस्तित्वात आली तरी तेथील अधिकाऱ्यांच्या आकृतीबंधावर काहीसा संभ्रम अनेकांच्या मनात होता. शासनाने मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी काढलेल्या आकृतीबंधास मान्यता देण्याच्या निर्णयाने हा संभ्रमही दूर झाला आहे.
शासन आदेशानुसार ड वर्गाच्या जालना महानगर पालिकेसाठी ३४ संवर्गात ४३ अधिकाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. यात एक अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहायक आयुक्तांसह विविध विभागाला स्वतंत्र अधिकारी देण्यात आले आहेत. आता या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया शासनस्तरावरून वेळेत होणे गरजेचे आहे. विविध विभागाचे स्वतंत्र अधिकारी रुजू झाल्यानंतर शहरातील मुलभूत समस्या मार्गी लावण्यासाठी मदत होणार आहे.
या पदांना मिळाली मंजुरीअतिरिक्त आयुक्त एक, उपायुक्त दोन, सहायक आयुक्त चार, मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी, सहायक मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, समाज विकास अधिकारी, विधी अधिकारी, सुरक्षा अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, अधीक्षक, महापालिका सचिव, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, लेखाधिकारी, उपमुख्य लेखा परिक्षक, वैद्यकीय अधिकारी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, पशुशल्य चिकित्सक, शहर अभियंता- जल अभियंता प्रत्येकी एक अधिकारी मिळणार आहे. दोन कार्यकारी अभियंते व चार उपअभियंतेही नियुक्त होणार आहेत. उपअभियंता पाणीपुरवठा, सहायक संचालक नगररचना, नगररचनाकार, सिस्टिम मॅनेजर, पर्यावरण संवर्धन अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळात दोन पदे भरली जाणार आहेत. तसेच परिवहन व्यवस्थापक, उपपरिवहन व्यवस्थापक, आगार व्यवस्थापक, मुख्य अग्निशमन अधिकारी, सहायक अग्निशमन अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत.