हुतात्मा सांडूजी वाघ यांना अभिवादन
जालना : शहरातील यशवंतनगर वसाहतीमधील नाभिक सेवा संघ कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील पहिले शहीद क्रांतिवीर हुतात्मा सांडूजी सखाराम वाघ यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी योगेश ढगे, खाडे, श्रीमंगले, राधाकिशन मंजुळ, बाबासाहेब गिराम, भारत चोरमरे आदी उपस्थित होते.
टाका ते चंदनापुरी रस्त्यात खड्डे
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील टाका ते चंदनापुरी - केकत जळगाव या रस्त्याची अतिवृष्टीमुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाकपणामुळे रस्त्याची वाट लागली आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला महापूर आला होता. महापुराच्या पाण्याने या रस्त्यावरील मुरूम पूर्ण वाहून गेला आहे.
बदनापूर येथे काँग्रेसची शुक्रवारी बैठक
जालना : जिल्ह्यातील आगामी नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आणि बूथ कमिटीचा आढावा घेण्यासाठी बदनापूर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक शुक्रवारी दुपारी २.३० वाजता महाराजा हॉटेल, बदनापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस बदनापूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई - पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
भोकरदन : राज्यात महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. मात्र, ई-पीक पाहणी हे ॲप ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, इंटरनेट रेंजच्या अभावाला वैतागले आहेत. ग्रामीण भागात नेटवर्कचा प्रश्न आणि अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईलही नाहीत. त्यामुळे आपल्या शेतीची नोंद कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. दुसरीकडे मोबाईल असूनसुद्धा ॲप चालवावे कसे, हे अनेक शेतकऱ्यांना समजत नाही.
भाव घसरल्याने झाडाला पिकल्या हिरव्या मिरच्या
धावडा : मागील आठवडाभरापासून बाजारात हिरव्या मिरचीला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तोड थांबवली असता या मिरच्या झाडावरच पिकू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा, वालसावंगीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरवर मिरची लागवड केली आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारातील मिरची लिलावात ४ रुपये ते १२ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यातच मिरची तोडणीचे ६ रुपये किलोप्रमाणे मजुरांना द्यावे लागत आहेत. तसेच लिलावात नेण्याचे प्रवासी भाडे ६० रुपये पोते आदी खर्च करावा लागतो. यामुळे झालेला खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी तोड थांबवली आहे.
सुखापुरी येथील गणेश मंडळास भेट
तीर्थपुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील विविध गणेश मंडळांना गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी भेट देऊन गणेश विसर्जन संबंधी मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी सरपंच प्रताप राखुंडे, पोलीसपाटील इलियास बागवान, लक्ष्मण राखुंडे, मच्छिंद्र राखुंडे, प्रल्हाद शिंदे, संभाजी शिंदे, महादेव फाटक आदींची उपस्थिती होती.
रस्त्यावर खड्डे
जालना : साळेगाव घारेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे चालणेही अवघड झाले आहे.