जालना : जालना पालिकेचे नागरिकांकडे गेल्या काही वर्षांपासून ६२ कोटी रूपये थकले आहेत. मध्यंतरी कोरोना प्रभावामुळे ही वसुली मोहीम थंडावली होती. परंतु, आता अनलॉक होऊन सहा महिने झाले आहेत. असे असताना आता कुठे पालिकेने वसुलीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्याधिकाऱ्यांच्या नोटीसमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. केवळ पाच टक्के वसुली झाल्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
दहा वर्षांनंतर पालिकेने गेल्यावर्षी मालमत्ता करात वाढ केली आहे. ही वाढ केल्यानंतर त्याचे बिलिंग करण्यातच एक वर्ष घालवले. नंतर गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. अशास्थितीत मालमत्ता कराची वसुली थांबली होती. परंतु, खऱ्या अर्थाने अनलॉक हे साधारणपणे मे महिन्यात सुरू झाले.
मात्र, असे असताना तेव्हाही पालिकेच्या नवीन कर आकारणीनुसार बिलिंग पूर्ण झालेले नसल्याने मालमत्ता करधारकांना ते देणे शक्य झाले नाही. असे असतानाच दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कर वसुली संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत ज्या करवसुली कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केला अशा जवळपास २९ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मुख्याधिकाऱ्यांच्या या निर्णयाने कर्मचारी नाराज झाले आहेत.
दरम्यान, एक तर ज्यावेळी ही मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे होते, त्याला आता विलंब झाला असून, मार्च महिना जवळ आल्याने आता केवळ दोन महिने हातात आहेत. त्यामुळे या दोन महिन्यात आम्ही जास्तीत जास्त कराची वसुली करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु, या नोटीसमुळे आमच्यातील अनेक कर्मचारी वैतागले आहेत. यासंदर्भात मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, वसुली करण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. परंतु, जर कोणी काम करत नसेल तर त्यांना नोटीस देऊन खुलासा मागवावाच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालिकेची वसुली केवळ पाच टक्के म्हणजेच १ कोटी ८९ लाख रूपये एवढी कमी झाल्याचे ते म्हणाले.