काँग्रेसच्या बळकटीसाठी जालन्याला मंत्रीपद गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:59 AM2020-01-05T00:59:34+5:302020-01-05T01:02:05+5:30
अनेक प्रलोभने येऊनही गोरंट्याल यांनी काँग्रेसची साथ न सोडता स्वत:च्या हिंमतीवर काँग्रेस जालन्यात जिवंत ठेवली. एवढे करूनही जर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जात नसेल तिसऱ्यांदा आमदार होऊन उपयोग तो काय, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष अस्तित्वात ठेवण्यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी केलेले प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहेत. अनेक प्रलोभने येऊनही गोरंट्याल यांनी काँग्रेसची साथ न सोडता स्वत:च्या हिंमतीवर काँग्रेस जालन्यात जिवंत ठेवली. एवढे करूनही जर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जात नसेल तिसऱ्यांदा आमदार होऊन उपयोग तो काय, असा संतप्त सवालही जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
जालना शहरातील महेश भवन येथे शनिवारी दुपारी काँग्रेस पदाधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत माजी आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले, कुठलीही निवडणूक असो, कैलास गोरंट्याल हे नेहमीच काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी पुढे येतात. जालना शहर तसेच परतूरमध्येही त्यांनी काँग्रेसला मदत केली आहे. एक युवा नेता काँग्रेससाठी सर्वस्व अर्पण करून निवडून येतो. तर अशा नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिलेच पाहिजे, असे मतही सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केले. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनीही कैलास गोरंट्याल यांच्याविषयी भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, कैलास गोरंट्याल हे आपले पती आहेत. असे असले तरी काँग्रेस पक्षाचा कुठलाही छोटा-मोठा कार्यक्रम असला तरी ते परिवारापेक्षा त्या कार्यक्रमाला जाण्यास महत्त्व देतात. त्यांनी तसेच आमच्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी संपूर्ण अयुष्य वेचले आहे. एवढे करूनही जर पक्षश्रेष्ठी दखल घेत नसतील तर ही खेदाची बाब म्हणावी लागेल.
माजी जिल्हाध्यक्ष रामप्रसाद कुलवंत म्हणाले, गेल्या वीस वर्षात जिल्ह्यात काँग्रेसला प्रयत्न करूनही फारसे यश मिळत नाही. अशा स्थितीत पक्ष जिवंत ठेवण्याचे काम कैलास गोरंट्याल यांनी मोठ्या ताकदीने उभे केले आहे. एवढेच नाही तर युतीच्या लाटेतही त्यांनी जालन्यात विजय मिळवून जिल्ह्यात काँग्रेसचा एकमेव आमदार कायम ठेवण्यास मदत केली आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कल्याण दळे, ज्ञानेश्वर भांदरगे, प्रभाकर पवार, सुषमा पायगव्हाणे, शहराध्यक्ष शेख महेमूद, बदर चाऊस, नवाब डांगे, गणेश राऊत, शेख रऊफ परसूवाले, विजय चौधरी, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, आनंद लोखंडे, विनोद यादव, शहराध्यक्षा शीतल तनपुरे, चंदाताई भांगडिया, मंगलताई खांडेभराड यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पक्षाच्या नेतृत्वाला राजीनामे देऊन जागे करू
जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनीही गोरंट्याल यांच्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेवर बोलताना सांगितले की, गोरंट्याल यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांचा सन्मान व्हायला हवा होता. परंतु, तो न झाल्याने एकप्रकारे काँग्रेसचेच नुकसान होत आहे. गोरंट्याल यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे नेते ज्ञानदेव पायगव्हाणे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, स्व. डॉ. शंकरराव राख यांच्या नंतर काँग्रेसला एकदाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. आता पक्षाला गोरंट्याल यांच्या रूपाने संधी देणे शक्य होते. परंतु तसे झालेले नाही. आता या पक्षाच्या नेतृत्वाला आम्ही राजीनामे देऊन जागे करण्याचा प्रयत्न करू, असेही पायगव्हाणे यांनी स्पष्ट केले.