जालना : एका पंचवीस वर्षीय तृतीय पंथीयास दरमहिन्याला दहा हजार रुपयांची खंडणी मागून ओळखीच्या इतर तृतीयपंथीयांनी मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर पीडितास पुणे येथे नेऊन विविध शस्त्रक्रिया करून लिंग परिवर्तन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. या प्रकरणी चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर भागात राहणाऱ्या सहा संशयितांसह इतर पंधरा ते वीस जणांविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित तृतीयपंथीय जालना शहरातील कन्हैय्यानगर भागात राहतो. संशयित इम्रान ऊर्फ तनुजा, नीलेश ऊर्फ निशा, नयना सलमान पठाण, माही पाटील, आकाश कोल्हे (सर्व रा. सुंदरनगर, जालना) व इतर पंधरा ते वीस जणांनी फिर्यादीस मारहाण करून दर महिन्याला दहा हजार रुपये खंडणी मागून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मारहाणीत जखमी फिर्यादी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना १५ मार्चला संशयितांनी शासकीय रुग्णालयात गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस पुन्हा मारहाण केली.
त्यानंतर फिर्यादीस पुणे येथे नेऊन विविध शस्त्रक्रिया करून फिर्यादीचे लिंग परिवर्तन केले, तसेच फिर्यादीस घरी जाऊ दिले नाही, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी जातिवाचक शिवीगाळ करण्यासह अन्य विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नीजर राजगुरू करीत आहेत. यातील चार संशयितांना अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी सांगितले.