लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवी मुंबई येथून चोरलेला ४० लाख रुपये किमतीचा ट्रेलर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घेतला. ही कारवाई शुक्रवारी दुपारी शहरातील राजूर चौफुलीवर करण्यात आली असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.एक व्यक्ती ट्रेलर (ट्रक) चा नंबर बदलत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवरून शुक्रवारी दुपारी स्थागुशाच्या पथकाने शहरातील राजूर चौफुली येथे कारवाई करून ट्रेलरसह एका व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगितले. संशय बळावल्याने पोलिसांनी चेसी क्रमांक व इंजिन क्रमांकावरून टाटा मोटर्सच्या मुंबई कार्यालयात माहिती घेतली. त्यावेळी हा ट्रेलर मुंबई येथील एका कंपनीला विक्री केल्याचे समजले. चौकशीमध्ये सदरील ट्रेलर नवी मुंबई येथून २७ जुलै रोजी चोरीस गेल्याने कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी ४० लाखाच्या ट्रेलरसह जगन्नाथ रामदुलार चौधरी (३९ रा. पणासा ता. करशना जि. इलाहाबाद उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. चौधरी याने ट्रेलर चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि दुर्गैश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, पोना प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रंजित वैराळे आदींनी केली.चालक चौधरी हा चोरून आणलेल्या ट्रेलरचा क्रमांक पेंटने बदलत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौधरी याने सदरील वाहनाचा पेंटद्वारे क्रमांक बदलून असा बनावट क्रमांक (एम.एच.१८- एच.८२६) टाकला होता.
नवी मुंबई येथे चोरलेला ट्रेलर जालना पोलिसांनी घेतला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:50 AM