बाबासाहेब म्हस्के/जालना : शहरातील स्वच्छतेबाबत कायम ओरड होत असली तरी आपल्या प्रभागातील अस्वच्छतेबाबत आॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी स्मार्ट फोनवर ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोड करण्यास जालनेकरांकडे वेळच नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक मिनिटाला फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचे स्टेटस चेक करणारी युवा पिढीही स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे यानिमित्ताने उघड होत आहे.स्मार्टफोनच्या जमान्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आॅनलाइन व्यस्त आहे. त्यामुळे नागरिकांना थेट मोबाईलवरच अॅपच्या माध्यमातून आपल्या भागातील अस्वच्छतेबाबत तक्रार करता यावी. तसेच सर्व रेकॉर्ड आॅनलाइन उपलब्ध व्हावे, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने स्वच्छता अॅप सुरू केले. महापालिका, नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड करावे याकरिता व्यापक जनजागृती केली जात आहे. जालना नगर पालिकेने नागरिकांना स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तीन लाख लोकसंख्येपैकी आठवडाभरात केवळ दीड हजार नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे हे प्रमाण ०.५ टक्के आहे. प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत नसला तरी शहर स्वच्छतेवर कायम ओरड होणाºया जालनावासियांनी अॅपच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने तक्रार करण्यास उदासीनता भूमिका घेतली आहे. जालना शहरातील सहा हजार नागरिक पहिल्या आठवड्यात अॅप डाऊनलोड करतील, अशी अपेक्षा पालिकेच्या स्वच्छता विभागातील अधिकाºयांना होती. परंतु नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे स्वच्छता अॅप डाऊनलोड करा, असे सांगत फिरण्याची वेळ आता पालिका कर्मचाºयांवर आली आहे. जालना एक्स्पोच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी याबाबत खंत व्यक्त केली. स्वच्छता अॅपच्या माध्यमातून केलेल्या तक्रारी वेळेत सोडविल्या जात नसल्याचे नागरिक सांगत आहेत.-----------स्वच्छता अॅपचे महत्त्व काय ?स्वच्छतेबाबतीत जालन्याचा देशातील क्रमांक ३३७ वा आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केल्यास स्वच्छतेच्या मानांकनात वाढ होणार आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आॅनलाइन तक्रारी दाखल केल्यास त्या पालिकेच्या पथकाला चोवीस तासांत तक्रार निवारण करून त्याचे फोटो अॅपवर अपलोड करावे लागणार आहेत. त्यामुळे शहराच्या चार हजारांपैकी अधिकाधिक गुण मिळणार आहेत. भविष्यातील विकास कामांचा निधी मिळण्यास यास फायदा होणार आहे.
‘स्वच्छता अॅप’ कडे स्मार्ट जालनेकरांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:45 AM