जालना : कॅशिअरनेच व्यवहारातील २३ लाख १३ हजार ५९ रुपयांची रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात टाकून बँकेची फसवणूक केल्याची अंबड येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड शहरात कॅनरा बॅँकेची शाखा आहे. या बँकेमध्ये संशयित सुजित कुमार रामसागर पाठक (रा. कोल्हापूर, ह. मु. स्वामी समर्थनगर अंबड) हा कॅशिअर म्हणून काम करतो.
सुजीत कुमार पाठक बँकेच्या व्यवहारातील काही रक्कम ही कंत्राटी कामगार असलेल्या संशयित योगेश प्रभाकर काळबांडे ( रा. रूई सुखापरी ता. अंबड ) याच्या खात्यावर टाकत होता. त्यांनी दीड वर्षांत जवळपास २३ लाख १३ हजार ५९ रुपये टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच बँकेची तपासणी झाली असता, त्यात पैशांमध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील कॅनरा बँकेचे रिजनल हेड विनयकुमार दाश यांनी बारकाईने लक्ष ठेवले.
त्यात त्यांना संशयित कॅशिअर सुजीतकुमार पाठक हा दुसऱ्याच्या खात्यात पैसे टाकत असल्याचे दिसून आले. विनयकुमार दाश यांनी अंबड पोलिस ठाणे गाठून संशयित सुजीतकुमार पाठक आणि योगेश काळबांडे या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपी फरार असून, त्यांचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पाटील यांनी दिली.