वडीगोद्री : देशात एकीकडे वेगाने विकास होत असताना दुसरीकडे छोट्या छोट्या गावांमध्ये मात्र आजही नागरिकांना सुविधांअभावी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने भर पावसात प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच रस्त्यावर महिला प्रसूती झाल्याची घटना अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ३० जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता घडला. दरम्यान, या प्रकारानंतर नातेवाईक, ग्रामस्थांनी या घटनेबाबत रोष व्यक्त केला.
वडीगोद्री येथील रुपाली राहुल हारे या महिलेला प्रसूती कळांचा त्रास होत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी तिला वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्षात घेऊन आले. तेव्हा नातेवाईकांनी दवाखान्यात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व महिला आरोग्य सेविका उपस्थित नव्हत्या. तेव्हा खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर येताच रस्त्यावरच भर पावसात त्या महिलेची प्रसूती झाली.त् यानंतर डॉक्टर व कर्मचारी यांना फोन केला. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि अन्य कर्मचारीच नसल्याने हा धक्कादायक प्रकार घडला.
प्रसुतीनंतरही तासभर माता, बाळ व नातेवाईक हे भर पावसात उभे होते. त्यानंतर खाजगी महिला डॉक्टर व परिचारिका यांनी येऊन गरोदर मातेची नाळ कापली. त्यानंतर गरोदर माता व चिमूकल्या बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असून माता व नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
डॉक्टर व कर्मचारी नसल्याने माझ्या पत्नीची प्रसूती रस्त्यावर झाली आहे. हा गंभीर प्रकार असून कामाच्या वेळेत उपस्थित नसलेल्या डॉक्टर व कर्मचारी यांना निलंबित करा. अन्यथा दवाखान्याला कुलूप ठोकण्यात येईल.
राहुल हारे,महिलेचा पती, वडीगोद्री
वडीगोद्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेसंदर्भात चौकशी समिती नेमली आहे. ही चौकशी समिती सदरील घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करेल. या अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल.डॉ.विवेक खतगावकर,जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना