लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील विद्यार्थिंनी दुचाकीवरून जात असताना त्यांना औद्योगिक वसहातीच्या तिसऱ्या टप्प्याजवळील एका वळणावर ट्रकने जोरदार धडक दिली. यात या तिघी जणी जखमी झाल्या आहेत. त्यातील निकिता किशोर शिंदे या विद्यार्थिंनीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिला औरंगाबादेतील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.बारवाले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान औरंगाबाद मार्गावर गेल्या होत्या. त्या नेमक्या कुठल्या कारणासाठी गेल्या होत्या, याचे स्पष्टीकरण कळू शकले नाही. एकाच दुचाकीवर एमएच २१, एक्स, ६४१६ यावर तिघीजणी होत्या. सनराईज ढाब्याजवळील वळण रस्त्यावर औद्योगिक वसाहतीकडून येणाºया भरधाव ट्रकने त्यांना जोराची धडक दिली.ही धडक लागल्याने मुलींच्या किंकाळ्या ऐकून सनराईज ढाब्याचे मालक मोहन इंगळे, रोषण इंगळे तसेच तेथील कर्मचारी अक्षय चिपकले, आनंद मगरे, विलास अंभोरे, रामेश्वर गव्हाड, दीपक खोमणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लगेचच त्यांच्या कारमधून या तिन्ही जखमी मुलींना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमी झालेल्यांमध्ये प्रिया भाग्यवंत, निकिता किशोर शिंदे, शर्मिन घंची यांचा समावेश आहे. या सर्वजणी बारवाले महाविद्यालयातील बीएसी तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. यातील निकिता शिंदेच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती बेशुध्द पडली होती.तिला अधिक उपचारासाठी औरंगाबादेतील एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले असून, तिच्यावर रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.दरम्यान, निकिता शिंदे वगळता अन्य दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाºयांनी दिली. या अपघाताची नोंद चंदनझिरा पोलीसांनी घेतली असून, या प्रकरणी ट्रक चालक गजानन जिजाभाऊ शिंदे याला ताब्यात घेतले आहे. या अपघामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर प्राचार्य तसेच तसेच अन्य प्राध्यापकांनी रूग्णालयात जाऊन जमखींची चौकशी करून भेट घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
जालन्यात तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना ट्रकने उडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:43 AM