- दीपक ढोले
जालना : राज्य सरकारने राज्यात गुटखा बंदी केली. गुटखाबंदी झाल्यानंतर सुरूवातीला काही काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. परंतु, शहरात सध्या सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असून याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ही बाब लोकमतने केलेल्या स्टिंग अॉपरेशनमधून उघडकीस आली.
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आली असून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. तरीही जालना शहरासह जिल्हाभरात सर्वत्र खुलेआम चढ्या भावाने गुटखा विक्री सुरू असून, शहरात गुटखा विक्रीचा घाऊक बाजार झाला आहे. शहरात किराणा मालाची दुकाने आणि पान टपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. सोमवारी लोकमतने केलेल्या स्टिंग अॉपरेशनमध्ये ही बाब उघडकीस आली. यात विशेष म्हणजे उघडपणे गुटखा विक्री होत असून, याकडे अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे. त्यामुळे गुटखा बंदी ही नावापुरती असल्याचे यातून उघड झाले आहे.
जिल्ह्यात खेडापाड्यांपासून ते शहरापर्यंत गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले आहे. दुकांन दारांनी गुटख्याचे दरही वाढविले आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडूनही कारवाई होतांना दिसत नाही. या भागात विक्रीवर कोणाचेच नियंत्रण नसल्यासारखी परिस्थिती दिसत आहे.हा गुटखा इतर राज्यातून येथे विक्रीसाठी येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळै प्रशासना समोर आव्हान कायम आहे.
भर दिवसा पुरविला जातोय मालछोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमधूनही परराज्यातून येणाऱ्या अनेक ब्रॅँडच्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत डोळेझाक करण्याची भूमिका घेत आहे. शहरात होलसेल गुटखा विकला जात आहे. विशेष म्हणजे भरदिवसा दुचाकीवर बॉक्स टाकून बिनधास्त लागेल, त्याला माल पुरवला जात असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग अॉपरेशनमध्ये आढळून आले. दरम्यान, या संदर्भात अन्न व औषधी प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, गुटखा विक्रीवर कारवाई सुरू आहे. परंतु आमच्याकडे कर्मचारी नसल्यामुळे कारवाई करण्यास विलंब होत आहे. शहरात लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.