जालना झेडपी महाविकास आघाडीच्या हाती; अध्यक्षपदी वानखेडे तर उपाध्यक्षपदी पवार यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 04:48 PM2020-01-06T16:48:41+5:302020-01-06T17:04:55+5:30
जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्य असून, जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठी २९ सदस्यांची आवश्यकता आहे.
जालना : अनेक दिवसांपासून उत्कंठा लागलेल्या जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले बळ दाखविले आहे. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे तर उपाध्यक्षपदी महेंद्र पवार यांची निवड करण्यात आली.
जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. गत काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. निवडणुकीत सकाळच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकासआघाडी आणि भाजपचे सदस्य उमेदवारी अर्ज घेवून गेले. परंतु, महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम वानखेडे यांनीच अर्ज भरला. तर उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या पुजा सपाटे व महेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केले. भाजपने दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने अध्यक्ष म्हणून उत्तम वानखेडे हे निश्चित झाले होते.
परंतु, उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरला नव्हता. महाविकास आघाडीने आपले सदस्य सहलीवर पाठवले होते. सभा सुरू होण्याच्याआधी महाविकास आघाडीचे सर्व सदस्य एकत्र आले होते. सभा सुरू होताना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे सर्व सदस्यांना जि.प. सभागृहात घेऊन आले. अध्यक्ष निश्चित झाल्याने उपाध्यक्ष कोण होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. निवडणूक निर्णय अधिकारी दीपाली मोतीयाळी यांनी उमेदवारी अर्जाची छाननी करून माघार घेण्यासाठी पंधरा मिनिटांची मुदत दिली होती. यावेळी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरलेल्या पुजा सपाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पिठासीन अधिकारी मोतीयाळी यांनी अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे उत्तम वानखेडे तर उपाध्यक्ष म्हणून महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. या बैठकीत पिठासीन अधिकारी दीपाली मोतीयाळी, सभागृह सचिव एन. आर. केंद्रे, उपजिल्हाधिकारी शरमिला भोसले, तहसीलदार संतोष बनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची उपस्थिती होती.