जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड महसूल मंडळातील पिकांचे परतीच्या पावसाने अमाप नुकसान झालेले आहे. नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे प्रशासनाकडून आदेश देवूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच पथकाने या भागातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले.
आॅक्टोबर महिन्यामध्ये जामखेड परिसरात जोरदार पाऊस झाला होता. यात कापूस, मका, बाजरी आदी पिकांचे अमाप नुकसान झाले होते. मात्र, महसूल अधिकाऱ्यांसकडून पिकांचे पंचनामे करण्यासाठी दुर्लक्ष करण्यात येत होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये ४ नोव्हेंबर रोजी ‘जामखेड मंडळाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत महसूल मंडळाधिकारी श्रीपाद मातोळे, ग्रामविकास अधिकारी के. कल्याणकर, तलाठी सानप, कृषी सहायक बाजीराव पाटील आदींनी तातडीने पंचनामे पूर्ण केले.
जामखेड मंडळांतर्गत बाधित असलेल्या २१ गावांमधील ११ हजार ३०० शेतक-यांपैकी ११ हजार १०० शेतक-यांच्या एकूण बाधित क्षेत्र असलेल्या ९ हजार ४० हेक्टर जमिनीवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तसेच या मंडळात शेतक-यांच्या पिकांचे ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे संबंधित अधिका-यांनी नऊ नोव्हेंबर पर्यंत घेतलेल्या आढावा नुसार स्पष्ट केले.