लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : परिसरातील भोगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूउपसा करणाऱ्या दोघांना गोंदी पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जेसीबी मशीन, ट्रॅक्टरसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ृ सणासुदीच्या सुट्टया असल्याने अधिकारी सुट्टीवर गेले आहेत. या संधीचा फायदा घेत अवैधवाळू तस्कर संधीचे सोने करण्यासाठी लोकेशनद्वारे पाळत ठेवून अवैधरित्या वाळू तस्करी करत आहेत. असे असतांनाही सणासुदीच्या काळातही पोलीस अथवा महसूलचे अधिकारी डोळ्यात तेल घालून अवैधवाळू तस्करांचे मनसुबे हाणून पाडत आहेत.भोगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून मंगळवारी पहाटे जेसीबी यंत्राच्या सहाय्याने टॅक्टर भरून दिले जात असल्याची माहिती पोलिसांना खबºयामार्फेत मिळाली. या माहितीवरून एपीआय अनिल परजने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.महेश तोटे, बाबा डमाळे, ज्ञानेश्वर मराडे, अमर पोहार यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी जेसीबी मशीन टॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळू भरताना आढळून आले.यानंतर पोलिसांनी जेसीबी मशीन, टॅक्टर असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात जेसीबी मशीन चालक भारत भगवान कोळेकर (रा. रेवकी, ता. गेवराई), टॅक्टर चालक प्रविण गंगाराम पवार (रा. राजुरी मळा ता.गेवराई) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेसीबी मशीन, ट्रॅक्टरसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:13 AM