भोकरदन : तालुक्यातील खडकी गावाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असुन प्रसूती वेदना होणाऱ्या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी एक किलोमीटरपर्यंत खाटेचा वापर करावा लागला.
तालुक्यातील खडकी हे गाव हसनाबादपासून तीन किलोमीटर अंतरावर असून गावाला जाणारा एकमेव रस्ता अत्यंत खराब आहे. त्यामुळे रस्त्यावरून कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. दि. २६ रोजी खडकी गावातील गर्भवती महिला वंदना किशोर पवार यांना प्रसव वेदना होऊ लागल्या. त्यासाठी त्यांनी हसनाबाद येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी फोन करून रुग्णवाहिका बोलविली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र गावाला जायला रस्ताच नसल्यामुळे रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यात येऊन थांबली त्यामुळे गावकऱ्यांनी सदर महिलेला खाटेवर बसून एक किलोमीटर अंतरापर्यंत नेले व नंतर रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेले. अशा प्रकारची कसरत नेहमीच करावी लागत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.
रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. अनेक वेळा या रस्त्यासाठी निवेदने दिली मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे आपण नागरिकांसह या रस्त्यावर रील खड्यात बसुन आंदोलन करू असा इशारा नानासाहेब वानखेडे यांनी दिला आहे