- अब्दुल रऊफ शेख
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आहे. सध्या धरण पूर्णपणे कोरडे झाल्याने ही बाब निदर्शनास आली आहे. भिंतीच्या बाजूला काम सुरू असल्याने कामामुळे हे भगदाड पडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सिंचन विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केलेले नाही. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
परिसरातील २५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणातून सुमारे ६०० हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आलेली आहे. मात्र, यंदा हे धरण पूर्णपणे कोरडे झालेले आहे. यामुळे सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड उघड झाले आहे. या धरणाच्या बांधकामाला १९५८ मध्ये सुरुवात झाली होती. १९६२ च्या दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाला. सुरुवातीला या धरणातून केवळ रब्बी हंगामासाठी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत होते. परंतु, धरणातून भोकरदन शहरासह अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव कोठा ठरवण्यात आला. डाव्या कालव्याद्वारे सोडलेले पाणी गोदावरीपर्यंत सोडले जात आहे. मागील पाच वर्षांपासून धरण शंभर टक्के भरल्यानंतर ओसंडून वाहत होते. मात्र, यंदा धरणाने तळ गाठला असून, ते कोरडे पडले आहे.
दगड निखळलेकाही वर्षांपूर्वी धरणाच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी पाणी झिरपू नये म्हणून भिंतीला दगड बसवण्यात आले आहेत. मात्र सध्या हे दगड निखळले आहेत. यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हे भगदाड पाणी विसर्ग होऊन भिंत फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुरुस्तीसाठी वरिष्ठांची परवानगी मिळाली
जुई धरणाच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठांची परवानगी मिळालेली आहे. ज्या ठिकाणी काम करण्याची गरज आहे. तेथील कामे तत्काळ सुरू करण्यात येतील. धरणाच्या भिंतीमुळे धोका निर्माण होणार नाही.- एम.जी. राठोड, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग