लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याच्या विविध भागांत गत दोन दिवसांत पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. बुधवारी भोकरदन तालुका व परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे भोरखेडा येथील शाळेच्या तीन वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले. तर अन्वा येथील जुई नदीला आलेल्या पुराचे पाणी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये घुसल्याने विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागले. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८.८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८.८५ मिमी पाऊस झाला. अंबड व परतूर परिसरात या कालावधीत पाऊस झाला नाही. उर्वरित तालुकानिहाय आकडेवारी पाहता जालना तालुक्यात २.५० मिमी, बदनापूर- ३.२०, भोकरदन ३६.७५, जाफ्राबाद १२.७, मंठा- १५, घनसावंगी ०.७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.भोकरदन तालुका व परिसरात बुधवारी दमदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात भोरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील तीन वर्गखोल्यांवरील पत्रे उडून गेले. तसेच वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले. या शाळेच्या इमारतीची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे केली. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने नवीन वर्गखोल्या बांधून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.आन्वा येथील जुई नदीला बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूर आला. या नदीचे पाणी आन्वा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात घुसले. अनेक वर्गखोल्यांमध्ये पाणी-पाणी झाल्याने येथील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसूनच ज्ञानार्जन करावे लागले. या पावसामुळे आन्वा, वाकडी, कुकडी भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वाकडी शिवारातील जमिनीचे प्रशासनाने पंचनामे केले.
जुई नदीला पूर; वर्गखोल्यांमध्ये पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:03 AM