लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील पाणी टंचाईचे ग्रहण सुटता सुटेना, सोमवारी रात्री पाचोडजवळील गाढेगाव येथील व्हॉल्व्ह फोडून पाणी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. ही व्हॉल्व फुटल्याची माहिती जालना पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना रात्री उशिरा कळली. ही माहिती मिळताच त्यांनी लगेचच पैठण येथे दूरध्वनी करून तातडीने पैठण येथील जलशुध्दीकरण केंद्रात सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद केला. तसेच मंगळवारी सकाळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर तसेच पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राजू बगळे यांच्यासह संबंधित एजंसीच्या कर्मचाऱ्यांनी गाढेगाव येथे भेट दिली. यावेळी पाणीपुरवठा बंद असल्याने व्हॉल्वची दुरूस्ती करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याचे खांडेकर म्हणाले.दरम्यान गाढेगाव येथील व्हॉल्वला मोठी गळती लागल्याने लाखो लिटरपाणी वाया गेले. हा व्हॉल्व कोणी फोडला हे अद्याप पुढे आले नाही.दरम्यान जालना तालुक्यातील गोलापांगरी येथेही व्हॉल्व फुटला होता, त्याचीही दुरूस्ती नगर पालिकेच्या पथकाने केल्याचे मुख्याधिकारी खांडेकर म्हणाले. दरम्यान या व्हॉल्वला गळती लागल्याने जवळपास पैठण येथून १२ तास पाणीपुरवठा बंद होता. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर कमी-अधिक प्रमाणात होणार असल्याची माहितीही खांडेकर यांनी दिली आहे.
जायकवाडी जलवाहिनीला भगदाड; दुरूस्तीसाठी जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:39 AM