लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळामधील ९ वर्षीय मुलीवर सहलीला निघण्यापूर्वीच काळाने झडप घातली. आंघोळ करून घरात येत असताना पाय घसरून गोपिका बालाजी क-हाळे हिचा मृत्यू झाल्याची घटना भोकरदन शहरातील पोस्ट आॅफिस परिसरात गुरूवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.भोकरदन येथील जि.प. कन्या शाळेची गुरूवारी सकाळी सहल जाणार होती. यासाठी शिक्षकांनी सर्वच विद्यार्थ्यांना ७ वाजता येण्यास सांगितले होते. त्यानूसार गोपिका क-हाळे ५ वाजता उठली होती. तिला सहलीला जाण्यासाठी तिच्या आईने डब्बाही तयार केला होता. गोपिका अंघोळ करून घरात येत असताना ती पाय घसरून खाली पडली. डोक्यावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने भोकरदन येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले.परंतु, डॉक्टरांनी तिला अधिक उपचारासाठी जालना येथे रेफर केले. जालना येथील डॉक्टरांनीही औरंगाबाद येथे रेफर केले. औरंगाबादला नेत असताना तिचा मृत्यू झाला.तिच्या अकाली मृत्यूने भोकरदन शहरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.गोपिका क-हाळे पडून जखमी झाल्याची माहिती शिक्षकांना मिळाली होती. तिला उपचारासाठी रूग्णालयात नेल्याने शिक्षकांनी सहल नेण्याचे ठरवले. परंतु, औरंगाबाद येथे गेल्यावर तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही अश्रुअनावर झाले.दरम्यान, गोपिका शाळेत सर्वात हुशार होती. तिचा कोणत्याही उपक्रमात नेहमीच सहभाग असायचा, असे शिक्षक संजय शास्त्री यांनी सांगितले.
सहलीला जाण्यापूर्वीच मुलीवर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 1:11 AM