जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान
जालना : राजसत्ता येतात आणि जातात, मात्र न्यायसत्ता चिरकाल टिकत असते. माणूस केंद्रिभूत असलेल्या भारतीय संविधानाने ‘अस्मिता’ दिली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख यांनी केले.
जुना जालना शनिमंदिर परिसरातील संत भगवान बाबा मंगल कार्यालयात आयोजित जाणीव अस्मितेची साहित्य परिषद जालना शाखेतर्फे ‘समता दिन’ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर होते. यावेळी समारंभाचे उद्घाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राख, साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी राम गायकवाड, विधिज्ञ बी. एम. साळवे, गीतकार डॉ. विनायक पवार, कवी डॉ. सुहास सदावर्ते, रक्षित गायकवाड यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, आजची परिस्थिती पाहता जात, धर्म, पंथ या चौकटीतून बाहेर जात माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विधिज्ञ बी. एम. साळवे, विधिज्ञ प्रदीप देशमुख, गीतकार डॉ. विनायक पवार, कवी डॉ. सुहास सदावर्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल आणि पुस्तक भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमात गीतकार विनायक पवार यांनी ‘आजोबा’ ही कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. विधिज्ञ साळवे यांनी पाच दशकांच्या आपल्या प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला. डॉ. सदावर्ते यांनी आपल्या भाषणातून सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी राम गायकवाड यांनी पुरस्कार निवडीची भूमिका विशद केली. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय डॉ. विजयकुमार कुमठेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. शशिकांत पाटील यांनी केले. हर्षदा कोठूरकर यांनी आभार मानले.
कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कविसंमेलन कवी डॉ. प्रभाकर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी डॉ. बी. जी. श्रीरामे, प्रा. अशोक खेडकर, उषा बोर्डे, रेखा गतखणे, मनीष पाटील यांनी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. जालना शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्याच्या बाबतीत आपण अशा कार्यक्रमांना प्राधान्य देत असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.