लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पहिल्यांदाच महिला मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाने नवीन पाऊल उचलले. विधानसभा क्षेत्रनिहाय सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.जालना शहरात एक, भोकरदनमध्ये दोन, बदनापूरमध्ये एक, सिल्लोडमध्ये दोन, फुलंब्रीत दोन, पैठणमध्ये दोन सखी मतदान केंद्रे होती. जालना शहरातील सेंट मेंरी स्कूलमध्ये सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. यावेळी येथील महिलांशी संवाद साधाला असता, त्यांनी या सखी मतदान केंद्रामुळे महिलांना न्याय मिळाला असल्याचे सांगितले.या केंद्रामध्ये मतदानासंबंधी सर्व प्रक्रियेचे संचालन महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने केले. केंद्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी देखील महिला पोलिसांनीच पार पाडली. महिलांनी निर्भिडपणे मतदान केंद्रावर पोहोचून मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपला मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावावा, हा या मागील उद्देश होता.आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेत महिलांना कधीच प्राधान्य मिळाले नाही; परंतु, लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये प्रथमच सखी मतदान केंद्र उभारण्यात आल्याने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय मिळाला, अशा प्रतिक्रिया सखी मतदान केंद्रात मतदान करण्यास आलेल्या महिला मतदारांनी व्यक्त केल्या.शासनाचा हा फारच छान उपक्रम आहे. यामुळे महिलांना मतदान करण्यास प्रोत्साहन मिळाले. एक चांगला उपक्रम राबविला. भविष्यातील निवडणुकांमध्ये देखील अशा प्रकारच्या व्यवस्था सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध झाल्यास निश्चितच मतदान करण्यास निरुत्साही असलेल्या नागरिकांना प्रोत्साहन मिळून मतदानाची आकडेवाडीचा आलेख उंचावला जाईल, असे शहरातील दीपाली चव्हाण यांनी सांगितले.भोकरदन : भोकरदन येथील न्यू हायस्कूलमधील बूथ क्रमांक १९३ मध्ये सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. याठिकाणी सर्व महिला कर्मचारी कार्यरत होत्या. केंद्राध्यक्ष म्हणून रेजा बोडके, सविता जाधव, प्रीती दौड, सरिता भोकरे तसेच महिला पोलीस कर्मचारी संगीता मोकाशे यांच्या देखरेखीत दिवसभर सुरळीत मतदान पार पडले. सकाळी ७ वाजेपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी पहिल्या मतदाराचे औक्षण करून प्रत्येकाला गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांचे अशा प्रकारे स्वागत बघून मतदारांना देखील समाधान वाटले.या सखी केंद्राला महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे, आ.संतोष दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन निवडणूक आयोगाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.सखी मतदान केंद्रासाठी सजावट तसेच इतर व्यवस्था करण्यासाठी सर्व महिला कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. पोलिसांचेही यावेळी मोठी मदत झाली.
सखी मतदान केंद्रामुळे महिलांना न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:20 AM