लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील खालापुरी येथील युवक नाथा तेलंग यांच्या खून प्रकरणातील चार संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मोठ्या शिताफिने पकडून जेरबंद केले. एक महिन्यानंतर का होईना; या खून प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सोमनाथ कचरु भालशंकर, योगेश प्रल्हाद चिमणे, दोन अल्पवयीन मुले या चार आरोपींना ताब्यात घेतले.घनसावंगी तालुक्यातील खालापुरी येथील मयत नाथा विठ्ठल पोगलवार (तेलंग) हा २ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटारसायकलने आपल्या शेताकडे जात असताना त्याच वेळी दोन मोटरसायकलने पाचही आरोपी शेतात पार्टी करण्यासाठी जात होते. मोटारसायकलला बाजू देण्याच्या किरकोळ कारणावरून मद्यपान केलेल्या पाच आरोपींनी नाथा पोगलवार याला बेदम मारहाण केल्यानेच पोगलवारांचा अंत झाला होता. पोगलवार यांनी प्रतिकार केल्याने त्यातील एकाने काही कळण्याच्या आत तीक्ष्ण हत्याराने आरोपींनी हत्याराने तोंडावर आणि छातीवर गंभीर वार केल्याने पोगलवार यांचा जागीच मृत्यू झाला. कोणाला दिसू नये म्हणून पाचही आरोपींनी घटनास्थळावरुन मोटारसायकलसह पळ काढला. मात्र तीर्थपुरी ते खालापुरी या मुख्य मार्गावर घटना घडल्याने ये - जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर कोणीतरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्याच्या छातीमध्ये खंजीर खुपसलेला असल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे १०० ते २०० ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मयत गावातील नाथा पोगलवार असल्याचे समजताच घरच्यांनी टाहो फोडला होता. एक आरोपी अद्याप फरार आहे.लोकमतच्या पाठपुराव्याला यश२ मार्च रोजी युवक नाथा पोगलवार यांचा खून झाला होता. पंधरा दिवसांनंतरही खुनाचा पोलिसांना छडा लागला नव्हता. लोकमतने या प्रकरणासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित करुन पोलीस प्रशासनाला जागे करण्याचे काम केले होते. महिन्यानंतर का होईना; यातील आरोपींना पकडण्यात आल्याने नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.पाचवा मुख्य आरोपी अद्यापही फरारया खून प्रकरणातील मुख्य पाचवा आरोपी विश्वजित पवार (रा. बाचेगाव) हा अद्यापही फरार आहे. त्याने मुंबईला पलायन केल्याची माहिती आहे. लवकरच पाचव्या आरोपीलाही गजाआड करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दोन आरोपींना ३ एप्रिलपर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर यांनी दिली.
खालापुरी खून प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:04 AM