ऑनलाईन लोकमत
भोकरदन ( जि. जालना ), दि. २८ : अर्धघाऊक रॉकेल विक्रेत्यास खंडणी मागितल्याचा २० डिसेंबर २००५ सालचा गुन्हा सिद्ध झाल्याने ४ पोलिस कर्मचारी व अन्य एकास भोकरदन दिवाणी न्यायालयाने आज दोन वर्षे समश्र कारावासाची शिक्षा सुनावली़.
या बाबत अधिक माहिती अशी कि, वालसांवगी येथील रॉकेलचे अर्धघाऊक विक्रेता भगवान शिनकर यांना २० डिसेबर २००५ रोजी बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलिस कर्मचारी सुभाष चांगदेव वानखेडे, गजानन ज्ञानेश्वर इंगळे, सुनिल लक्ष्मण जाधव, अंकुश मदनसिग राजपूत व वालसांवगी येथील मदन फकिरा कोथळकर, विनोद खडके यांनी संगनमत करून शिनकर यांना तुम्ही काळ्या बाजारात रॉकेल विकले आहे असे सांगितले. आम्ही विषेश पथकाचे पोलीस आहोत तुमच्यावर केस करू, तुमची पोलिस कस्टडी घेऊ असे हि शिनकर यांना त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर त्यांना गाडीपर्यंत नेऊन त्याच्याकडे ५० हजार रूपयांची खंडणी मागितली.
यावर शिनकर यांनी पारध पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरूध्द खंडणी मागितल्याची फिर्याद दिली होती. यावरुन खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक कैलास काळे यांनी तपास पूर्ण करून भोकरदन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाकडून साक्ष व पुरावे तपासण्यात आले. यात साक्षीदारानी विनोद खडके हा घटनास्थळी नसल्याचे सांगितल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता केली. तसेच खंडणी मागणीचा गुन्हा सिध्द झाल्यामुळे आरोपी सुभाष चांगदेव वानखेडे, गजानन ज्ञानेश्वर इंगळे, सुनिल लक्ष्मण जाधव, अंकुश मदनसिग राजपुत व मदन फकिरा कोथळकर यांना प्रथमवर्ग न्यायधीश के.एच़ पाटील यांनी दोषी ठरविले. भादंवि कलम ३८४ सह ३४ अन्वये दोषी ठरवून पाचही आरोपींना दोन वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.