- अशोक डोरले अंबड : केंद्रीय पथकातील मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी हरीश हुंबर्जे , केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉ. ए. एल. वाघमारे यांनी आज सकाळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. डावरगाव, वलखेडा, पांगरखेडा, ताडहदगाव, खडकेश्वर पाझर तलाव येथे पथकाने भेट देऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.
पथकाने सर्वप्रथम डावरगाव येथे भेट दिली. शेतकरी सचिन मोहन धुपे, नितीन मोहन तुपे यांचे गट नंबर 108 मधील शेतीची पाहणी केली. यंदा कापसाचा अर्धा खर्च सुद्धा निघालेला नाही, खरीप आणि रब्बी दोन्ही पिके घेता आली नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी यावेळी पथकासमोर मांडली.तसेच अंबड तालुक्याचा उत्तर भाग हा नेहमी दुष्काळग्रस्त असतो यामुळे येथे एक्सप्रेस कालवा झाला पाहिजे, अशी मागणी केली.
यानंतर पथक वलखेडा येथील गट नंबर 71 मध्ये आले. तेथे गोदावरी सिताराम कान्हे यांच्या कापसाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. सोयाबीनचा तर भुसा सुद्धा हाताला आला नाही, अशा भावना व्यक्त केल्या. तसेच शासन म्हणते की कडधान्य पेरा, परंतु कडधान्यांपासून आम्हाला काहीही उत्पन्न मिळत नाही. येथे कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
त्यानंतर पथकाने पांगरखेडा येथील भास्कर अंबादास कोल्हे यांच्या गट नंबर ८६ मधील क्षेत्रात पाहणी केली. त्या ठिकाणी कापूस आणि आंतरपीक म्हणून तुर हे पीक दिसून आले. या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांनी व्यथा मांडली आणि शेतीसाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था शासनामार्फत झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यानंतर पथकाने खडकेश्वर पाझर तलावाची पाहणी केली. प्रकल्प २००५ साली पूर्ण झालेला असून यावर्षी प्रकल्पात पाणीच आलेले नाही, अशी माहिती अभियंत्यांनी दिली.
ताडहदगाव मधील गट नंबर ३२ मधील शेतकरी अनिल अशोक दिवटे यांच्या मोसंबीच्या शेतात पथक दाखल झाले. या ठिकाणी मोसंबी पिवळी पडलेली दिसून आली. भाव अत्यंत कमी असल्याने खर्च सुद्धा निघणार नाही, असा टाहो संबंधित शेतकरी यांनी फोडला. यावेळी पथकासोबत अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार , तहसीलदार चंद्रकांत शेळके, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.