जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या विरूध्द दंड थोपटणाऱ्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न भाजपकडून युध्दपातळीवर सुरू आहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास दूत म्हणून जालन्यात येत असून ते उभयतांमध्ये दिलजमाई करणार असल्याचे समजते.शनिवारी दानवे आणि खोतकर हे आरोग्य तपासणी शिबिराच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले, खरे परंतु त्यानंतरही खोतकरांनी आपल्या माघारीचे दोर अद्याप कापले नसल्याचे सांगितले. खोतकरांनी थेट दानवे यांच्याविरोधात दंड थोपटले असून ते लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. जालन्याची जागा भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे खोतकऱ्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. शिवसेना-भाजपाची युती झाल्यामुळे खोतकर यांची पंचाईत झाली आहे. ते काँग्रेसकडून निवडणूक लढवितील, असे सांगितले जात असले तरी खोतकरांनी आपले पत्ते अद्याप उघड केले नाही. आता सहकारमंत्र्यांची शिष्टाई कितपत यशस्वी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
खोतकर-दानवे यांच्या दिलजमाईचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 5:12 AM