जालना : राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीत असलेल्या जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत मे अखेर संपत होती. त्यामुळे देव पाण्यात ठेवून बसलेल्या भाजपला आणखी वाट पाहावी लागणार आहे, हे आता नवीन निर्णयामुळे स्पष्ट झाले असून, सलग १४ वर्ष सभापतीपद उपभोगण्याचा सन्मान मिळालेल्या माजी मंत्री अर्जुन खोतकरांना हा एकप्रकारे माेठा दिलासाच म्हणावा लागेल. मराठवाड्यात लातूरनंतर जालना बाजार समितीची उलाढाल राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीत होते. जालन्यातील भुसार मालाचे मार्केट संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून, येथील व्यवहाराचे वैशिष्ट म्हणजे येथे शेतकऱ्यांना माल खरेदी केल्यावर लगेचच आडत्यांकडून रोखीने पैसे मिळतात. त्यामुळे शेजारील विदर्भासह मराठवाड्यातून येथे माल विक्रीसाठी आणला जातो. जालना बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे जालन्यासह बदनापूर तालुका आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जालना बाजार समितीवर साधारपणे २००७पासून खोतकरांचे वर्चस्व आहे. खोतकरांच्या म्हणजेच शिवसेनेच्या ताब्यात ही बाजार समिती आहे.
सध्या या बाजार समितीत भाजपही शिवसेनेसोबत असून, भाजपचे भास्कर दानवे हे उपसभापती आहेत. या बाजार समितीची मुदत मे अखेर संपत होती. त्यामुळे साधारणपणे जूनमध्ये समितीच्या निवडणुका होतील, असे संकेत होते. परंतु, आता कोरोनाचे कारण देत राज्यातील जवळपास २७७ बाजार समितींच्या निवडणुकीला राज्य सरकारने आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ मिळाल्याने जालना बाजार समिती आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी कंबर कसून बसलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा मात्र हिरमोड न झाल्यास नवल. खोतकरांनी जालना बाजार समितीचा कारभार करताना काही मोजके मुद्दे बाजूला ठेवले तर अनेक मुद्द्यांवर लक्षणीय कामे करून समितीच्या वैभवात भर घातली आहे.
त्यांनी बाजार समितीच्या श्याम लॉजसमोरील जागेत व्यापारी संकुल उभारले आहे. तसेच औषध बाजार आणि समोरील बाजूलाही दुकाने काढून बाजार समितीच्या उत्पन्नात भर घातली आहे. खोतकरांच्या या निर्णयावर त्यांचे राजकीय विरोधक आमदार कैलास गोरंट्याल हे समाधानी नसून, श्याम लॉजसमोरील जागा ही जालना पालिकेची असल्याचा दावा त्यांनी करून याला न्यायालयात आव्हानही दिले आहे. परंतु, हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात येते. याच व्यापारी संकुलाच्या मुद्द्यावरून २०१६मध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी जोरदार आक्षेप घेतले होते. परंतु, नंतर सर्व काही जैसे थे झाले आहे. तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनीही तूर खरेदीच्या मुद्द्यावरून त्यावेळी खोतकरांना लक्ष्य केले होते, हे विशेष.
आपण चांगल्या कामांनाच दिले प्राधान्य
जालना बाजार समिती ही एक अत्यंत महत्त्वाची समिती आहे. जालन्यातील व्यापारी, शेतकरी मोठ्या विश्वासाने येथे व्यवहार करतात. त्यांच्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ दिला नाही. परंतु, राजकीय इर्षेतून काहीजण आपल्यावर आरोप करतात. परंतु, अद्यापपर्यंत विरोधकांनी केलेला एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. केवळ राजकीय स्वार्थ म्हणून केलेल्या आरोपांनी विचलित न होता अधिकाधिक चांगले काम करून जालना बाजार समितीचा नावलौकिकच आपण वाढवला आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळाली नसती, तरीदेखील आमच्याच पक्षाच्या ताब्यात ही समिती आली असती आणि भविष्यातही येईलच.
- अर्जुन खोतकर, सभापती, बाजार समिती, जालना.