जालना : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील जिल्हा क्रीडा संकुलावर गुरूवारपासून १४ आणि १७ वयोगटातील मुला, मुलींच्या औरंगाबाद विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा घेतल्या जात आहेत. या स्पर्धेत संघाला विजयी करण्यासाठी मैदानावरील चिखल तुडवितच खेळाडूंना कसब पणाला लावावे लागत आहे. विशेषत: गोलकिपरची भूमिका पार पाडणाऱ्या खेळाडूला चिखलात उभारल्यानंतर गोल रोखायचा की स्वत:चा बचाव करायाचा असाच प्रश्न पडत असल्याची व्यथा काही खेळाडूंनी व्यक्त केली.
कोट्यवधी रूपये खर्च करूनही जिल्हा क्रीडा संकुलावर खेळाडूंना सुविधा मिळत नाहीत. थोडाही पाऊस झाला की क्रीडा संकुलावर चिखल होतो. क्रीडा संकुलावरील या चिखलातून चालता येत नाही. अशा मैदानावर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने २८ ते ३० जुलै या कालावधीत औरंगाबाद विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा घेतल्या जात आहेत. या स्पर्धेत जालन्यासह औरंगाबाद, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यातील मनपा व जिल्ह्याचे संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेत गुरूवारी १४ वर्षे वयोगटात हिंगोली ग्रामीण वगळता एकूण १३ संघ गुरूवारी विजयासाठी एकमेकांना भिडले. परंतु, पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत या मुला- मुलींना चिखलातच आपले कसब पणाला लावावे लागले. जिथे चिखलातून चालता येत नव्हते तिथे संघाच्या विजयासाठी फुटबॉलला किक मारावी लागली. स्पर्धेत अनेक मुलं- मुली पाय घसरून चिखलात पडत होते. विशेषत: गोल किपर उभा राहण्याच्या ठिकाणी तर खूपच चिखल होता. त्यामुळे गोल वाचवायचा की स्वत:चा बचाव करायचा अशी मानसिकता होत असल्याचे काही खेळाडूंनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. शिवाय काही प्रशिक्षकांसह शिक्षकांनीही मैदान आणि क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत नाराजी व्यक्त केली.
पंधरा हजारात नियोजनशासनाच्या वतीने विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी केवळ पंधरा हजार रूपये अनुदान दिले जात असल्याचे सांगण्यात आले. याच अनुदानातून उद्घाटन कार्यक्रमासह स्पर्धेचा इतर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे मुलांचे जेवण आणि राहण्याचा खर्च संबंधित संघांना करावा लागतो.
लवकरच डागडुजी केली जाणारपाऊस पडल्याने जिल्हा क्रीडा संकुलावर चिखल झाला होता. क्रीडा संकुलाच्या दुरूस्तीसाठी जवळपास १३ कोटींचा निधी मंजूर आहे. लवकरच या क्रीडा संकुलाची डागडुजी केली जाणार आहे.- अरविंद विद्यागर, प्र. जिल्हा क्रीडाधिकारी, जालना