जालना : आजीच्या कुशीत झोपलेल्या एका पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला तमाशाच्या फडात विक्री करण्याचा आरोपींचा डाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने उधळला आहे. पोलिसांनी या प्रकरणात शुक्रवारी सकाळी नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे लपून बसलेल्या पती-पत्नीसह त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले. ही घटना २५ एप्रिल रोजी पहाटे जालना येथील बसस्थानकात घडली होती.
महादेव एकनाथ साकडे (वय ३७), शोभा महादेव साकडे (वय ३५) व त्यांचा मुलगा राजेंद्र महादेव साकडे (वय २१, सर्व रा. घोडका राजुरी, ता.जि. बीड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. एक वृद्ध महिला आपल्या नातीसमवेत २४ एप्रिल रोजी रात्री जालना येथील बसस्थानकात झोपली होती. २५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी आजीच्या कुशीत झाेपलेल्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. या प्रकरणात वृद्धेच्या तक्रारीवरून सदरबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या तपासाबाबत वरिष्ठांकडून सूचना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची टीम कामाला लागली होती. त्या मुलीचे अपहरण करणारे तिघे नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी सकाळीच पती-पत्नीसह त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या मुलीची सुटका केली. विशेष म्हणजे अपहरण केलेल्या त्या चिमुकलीला नारायणगाव येथील तमाशाच्या फडात विक्री करण्याची तयारी असल्याची कबुली त्या तिघांनी दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. रामेश्वर खनाळ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पहुरे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, सुधीर वाघमारे, दत्ता वाघुंडे, सतीश श्रीवास, योगेश सहाने, धीरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुळे, रमेश पैठणे, महिला अंमलदार चंद्रकला शडमल्लू यांच्या पथकाने केली.
सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणअल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. जालना, परभणी, बीड, नांदेड, पुणे परिसरात पथकाने शोधाशोध केली. सीसीटीव्ही फुटे, तांत्रिक विश्लेषणामुळे व मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या मुलीचा शोध घेऊन सुटका करण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.
...अन् आजीच्या डोळ्यातून अश्रू तरळलेकाळजाच्या तुकड्याचे अपहरण झाल्याने आजीच्या काळजाचा ठोका चुकला होता. गत आठ दिवसांपासून ती कुठे असेल, काय करत असेल, या चिंतेने ती व्याकूळ झाली होती; परंतु शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्या मुलीला आजीच्या ताब्यात दिले. मुलीला मिठीत घेवून आजीने हंबरडा फोडला होता. धायमोकलून रडणारी आजी पाहता उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही गहिवरून आले होते.