फोटो
सदर बाजार पोलिसांची कारवाई; सातारा येथून ९ आरोपींना अटक
जालना : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखो रुपयांना लुटणाऱ्याचे अपहरण करून त्याला सातारा येथे घेऊन गेलेल्या नऊजणांना सदर बाजार पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वैभव भैरू पाटील (वय २१, रा. तिरपण्या, जि. कोल्हापूर), सतीश गराडे (२३, रा. आमनेवाडी, जि. कोल्हापूर), प्रशांत संभाजी पवार (२९, रा. करंजोशी जि. कोल्हापूर), पुष्पराज मारोती जाधव (२६, रा. युलूर, जि. सांगली), वैभव भास्कर शेशवारे (३५, रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), मनोहर भास्कर शेशवारे (४२, रा. अगरण धुळगाव, जि. सांगली), नितीन बाळू दाढे (२३, रा. वाफळे जि. सोलापूर), गणेश पांडुरंग दाढे (२९, रा. वाफळे, जि. सोलापूर), शरद बाळू दाढे (२५ रा. वाफळे, जि. सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली.
विठ्ठल विजयसिंग जारवाल (रा. राजेवाडी ता. बदनापूर) हा १४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी साडेअकरा वाजता आपल्या मित्रासोबत जालना येथील बसस्थानकात उभा होता. तेव्हाच नऊजणांनी त्याला मारहाण करून गाडीत बसवले. त्यानंतर त्याला आरोपी गाडीतून घेऊन गेले. या प्रकरणी तरुणाच्या नातेवाइकांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासून गाडीचा क्रमांक काढला. अपहरणकर्ते अंबड, पैठण, शेगावमार्गे जात असल्याची माहिती मिळाल्याने सातारा, कोल्हापूरकडे पथके रवाना करण्यात आली होती. पो. नि. देशमुख यांनी अहमदनगर, सातारा, कोल्हापूर येथील नियंत्रण कक्षास कळविले होते. सातारा पोलिसांनी संबंधित युवकांचे फोन नंबर ट्रेस करून अपहरण झालेल्या युवकाची सुटका केली. यावेळी नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संजय देशमुख, कर्मचारी कैलास खार्डे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे यांनी केली.
नोकरी लावून देतो म्हणून घेतली मूळ कागदपत्रे
अपहरण झालेला विठ्ठल जारवाल हा सातारा येथील बहिणीच्या घरी गेला होता. तेव्हाच येथील वैभव शेशवारे याच्यासोबत त्याची ओळख झाली. यावेळीच माझे दिल्ली येथे नातेवाईक मंत्री आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला सरकारी नोकरी लावून देतो. आम्ही डमी उमेदवार बसवून परीक्षा पास करून घेतो, असे सांगून जारवालने संबंधित तरुणाची मूळ कागदपत्रे घेतली. नंतर जारवाल हा टाळाटाळ करीत असल्याने वैभव शेशवारे याने त्याला कागदपत्रांची मागणी केली. तुला कागदपत्र पाहिजे असेल तर मला पैसे दे, असे म्हणून विठ्ठल जारवालने वेळोवेळी पैसेसुद्धा घेतले; परंतु तरीही त्याने कागदपत्र देण्यास टाळाटाळ केली. नंतर जालना येथील बसस्थानकात बोलवून त्याचे अपहरण केले.
अपहरण केलेल्या तरुणाकडून कागदपत्र जप्त
सर्व आरोपी हे सातारा येथे सिक्युरिटी म्हणून काम करतात. सरकारी नोकरी मिळण्यासाठी त्यांनी अपहरण झालेल्या इसमास मूळ कागदपत्र दिली होती. जारवाल याने आरोपींकडून लाखो रुपये घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी जारवाल याच्याकडून संबंधित तरुणांची कागदपत्रे जप्त केली. विठ्ठल जारवालविरुद्ध आरोपीही फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.