जालना : जलसंधारण विभागाकडून पळसखेडा, उमरखेडा आणि बेलारा येथे साडेचार कोटी रुपयांच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. ही कामे करताना ती चार जणांनी संयुक्तरीत्या केली आणि कामांचे देयक आल्यावर त्यातील ठरलेली रक्कम न दिल्याने हा वाद आता पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंडाळे यांच्यासह दौलतराव जाधव, व्यंकट काकडे आणि दिलीप राऊत यांनी नुकतीच पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेतली. यावेळी हे काम शासकीय कंत्राटदार महेंद्र अंभोरे यांनी केले होते. ही तिन्ही कामे साडेचार कोटींची होती. ही कामे करताना या चौघांमध्ये आर्थिक देवाणघेवाणविषयक बोलणी झाली होती. त्यानुसार आलेल्या बिलाची रक्कम वाटून घेणार होते. परंतु, यात गोपाळ बोराडे यांनी कंत्राटदार अंभोरेंकडून आधी ८३ लाख आणि नंतर ५६ लाख रुपये उचलल्याचे खंडळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. असे असताना त्यातील जो ठरलेला हिस्सा होता, तो न दिल्याने व्यंकट काकडे तसेच दिलीप राऊत यांच्यावर आर्थिक संकट कोसळल्याचे म्हटले आहे.
या सर्व प्रकरणाची आपण योग्य ती चौकशी करू, असे आश्वासन पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिले. परंतु, हा वाद तेव्हाच मिटू शकतो ज्यावेळी गोपाळ बोराडे तसेच कंत्राटदार अंभाेरे, राऊत, काकडे हे चौघे एकत्र आल्यास त्यावर तोडगा निघेल, असेही म्हटले आहे.
या संदर्भात गोपाळ बोराडे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवरून संपर्क साधला; परंतु तो होऊ शकला नाही.