लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणातील पाणी मराठवाड्यात आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी भोकरदन येथे महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत दिली. येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना विरोधी पक्षनेत्यासाठी लागणा-या जागा सुध्दा मिळणार नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला.भाजपाची महाजनादेश यात्रा सिल्लोड येथून बुधवारी दुपारी ४़४० वाजता भोकरदन शहरात दाखल झाली. मुख्यमंत्री विराजमान असलेल्या रथाची शहरातून ढोलताशाच्या गजरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी खा़ किरीट सोमय्या, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, निर्मला दानवे, विलासराव अडगावकर, कौतिकराव जगताप, आशा पांडे, रेणुताई दानवे, राजेंद्र देशमुख, गोविंदराव पंडित, साहेबराव कानडजे, शालिकराम म्हस्के, मुकेश पांडे, गणेश फुके, दीपक पाटील, विजयसिंह परिहार, संतोष लोखंडे यांची उपस्थिती होती़ यावेळी आमदार संतोष दानवे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले़मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ वर्षाच्या सत्तेच्या काळात २० हजार कोटींची मदत मिळाली. आम्ही ५ वर्षाच्या काळात ५० हजार कोटी रूपयांची मदत केली आहे. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाडा गेल्या तीन-चार वर्षापासून दुष्काळाशी सामना करीत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आम्ही कोकणातील १६७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार आहोत. पिण्याच्या पाण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रेड योजनेच्या माध्यमातून ६४ हजार किलो मीटर पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी ४ हजार कोटींच्या कामाची निविदासुध्दा निघाली आहे.केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून भोकरदन -जाफराबाद मतदार संघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. गेल्या ३५ वर्षापासून तुम्ही मला साथ दिली आहे. येणाºया काळात सुध्दा तुम्ही भाजपाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे, असेही ते म्हणाले. जाफराबाद शहरासाठी सिल्लोड भोकरदन संयुक्त पाणी पुरवठा योजनेतून पाणी देण्यात यावे, शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारावा, महिला बचत गटांना बचत भवनाचे बांधकाम करून द्यावे व औद्योगिक वसाहती मध्ये उद्योगांना चालना द्यावी अशी मागणी केली. यावेळी आमदार नारायण कुचे, आशा पांडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी डॉ. चंद्रकांत साबळे, सुभाष देशमुख, मुकेश चिने, पंढरीनाथ खरात, राजेश चव्हाण, दत्तू पंडित, आशा माळी, सुनीता सपकाळ, शोभा मतकर, निर्मला बलरावत, दीपक जाधव, सतीश रोकडे, रमेश पांडे, सेनेचे नवनाथ दौड, सुरेश तळेकर, भूषण शर्मा आदींची उपस्थिती होती. संचालन गजानन तांदुळजे यांनी केले. उध्दव दुनगहु यांनी आभार मानले़बाप से बेटा सवाईसंतोष दानवे हा सर्वात तरूण आमदार असून, या भागातील विकास काम घेऊनच तो माझ्याकडे येतो व काम झाल्यावर उठतो. त्यामुळे त्यांनी पाच वर्षाच्या काळात आणलेल्या सर्वच विकासाच्या कामांना आपण मंजुरी दिली आहे. एक प्रकारे तो बाप से बेटा सवाईच निघाला आहे.त्याचे वडील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणार आहे. त्यामुळे संतोष दानवे यांना येणाºया निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. जाफराबादचा पाणीप्रश्न निकाली काढणार असून, बचत गटांना सुध्दा बचत भवन बांधून देण्याचा कायदा करू, असे त्यांनी सांगितले़
मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी कोकणाचे पाणी आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 1:25 AM