जालना : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतु, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असून, त्यात आता कोरोनामुक्त झालेल्या बालकांना एमएसआयसी आजाराची लागण होण्याचा धोका वाढला आहे. या आजाराची लागण होऊ नये यासाठी कोरोनामुक्तीनंतरही प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, आजवर ६१ हजारांवर नागरिकांना बाधा झाली आहे, तर ११४१ जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये शून्य ते दहा वर्षे वयोगटातील १८८८ बालकांनाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुक्तीनंतर म्युकरमायकोसिस, बुरशीजन्य आजाराचा संसर्ग यापूर्वीच आढळून आला आहे. त्यात आता कोरोनामुक्त झालेल्या बालकांना एमएसआयसी आजाराची लागण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमित मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. कोणताही शारीरिक त्रास होत असेल तर तज्ज्ञ डाॅक्टरांकडून औषधोपचार घेणे महत्त्वाचे आहे.
ही घ्या काळजी
लहान मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नये. मुलांना कोणताही शारीरिक त्रास असेल तर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावेत.
कोरोनामुक्त झालेल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी. तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळोवळी त्यांची शारीरिक तपासणी करावी. औषधोपचार घ्यावेत.
मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी ज्येष्ठांनीही घराबाहेर जाताना आणि बाहेरून घरी आल्यानंतर प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात १८८८ बालकांना कोरोना
जिल्ह्यातील शून्य ते दहा वर्षे वयोगटातील आजवर १८८८ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर या बालकांनी कोरोनावर मात केली आहे.
सूचनांचे पालन आणि वेळेवर उपचार गरजेचे
कोरोनाची लागण होऊच नये, यासाठी मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनामुक्त बालकांना एमएसआयसी आजाराबाबत त्रास असेल तर तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.
- डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक