जालना : रेशन कार्ड काढून देण्यासाठी २०० रुपयांची लाच घेणाऱ्या कोतवालला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले. पुंजाराम यदुजी लोखंडे (४७ रा. वंजार उंम्रद, ता. जि. जालना) असे संशयिताचे नाव आहे.
तक्रारदाराला नवीन रेशन कार्ड काढायचे होते. यासाठी त्यांनी जालना तहसील कार्यालयात अर्ज केला होता. नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी कोतवाल पुंजाराम लोखंडे यांनी २०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी तहसील कार्यालयात सापळा लावून २०० रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. कोतवाल पुंजाराम लोखंडे यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलिस निरीक्षक सुजित बडे, गजानन घायवट, जावेद शेख, शिवाजी जमधडे, गणेश बुजाडे, कृष्णा देठे आदींनी केली आहे.