लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील शिवनी येथील पाण्याचे बजेटिंग करणारे कृषी विज्ञान केंद्राचे संपर्क शेतकरी कृषीभूषण उद्धव खेडेकर यांना मंगळवारी नवी दिल्ली येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा प्रतिष्ठेचा एन. जी. रंगा शेतकरी पुरस्कार कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा आणि माजी महासंचालक पंजाब सिंग यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.कृषिभूषण उद्धवराव खेडेकर यांनी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शिवनी या गावात प्रतिकूल हवामानात घ्यावयाची पिके तसेच पाणी व्यवस्थापन यावर मोलाचे काम केलेले आहे. पाण्याच्या थेंबा थेंबा चा हिशोब ठेवणारे गाव म्हणून शिवनी गावास लौकिक प्राप्त झाला आहे. नंदापूरचे शेतीनिष्ठ शेतकरी सरपंच दत्तात्रय चव्हाण यांनी नंदापूर येथे कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली द्राक्ष शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाण्याचे विशेष नियोजन करून शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत द्राक्ष उत्पादन करून जिल्ह्यामध्ये द्राक्ष शेती फायद्याची कशी, हे सर्वांना दाखवून दिले. कृषी तज्ज्ञांसमोर प्रयोग मांडण्यासाठी त्यांची निवड झाली होती.
कृषीभूषण खेडेकरांचा दिल्लीत गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:48 AM