टेंभुर्णी : टेंभुर्णी- कुंभारझरी या रस्त्याचे काम गत सहा महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. होणारे कामही व्यवस्थित होत नसल्याने या मार्गावरून वाहने चालविताना चालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. संथ गतीने काम सुरू असले तरी बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी- कुंभारझरी- काळेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के यांनी आमदार संतोष दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे या रस्ता कामाला १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या रस्त्याचे काम ऑगस्ट महिन्यात सुरू झाले आहे. सहा- सात महिने झाले तरी या मार्गाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. आजवर या रस्त्यावर गिट्टीचे तीन वेळा थर अंथरण्यात आले; मात्र प्रत्येक थर टाकल्यानंतर तो थर उखडला की दुसरा थर टाकला जात आहे. सध्या मार्गावरील तिसरा गिट्टीचा थर पूर्णत: उखडला आहे. या मार्गावरून प्रवास करताना चालकांना जीवघेणी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्यामुळे कुंभारझरी, काळेगाव, खानापूर, सावरगाव म्हस्के, डोलखेडा, खल्याळ गव्हाण, सिनगाव, वरखेडा फिरंगी आदी गावांच्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
कॅप्शन : टेंभुर्णी- कुंभारझरी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने होत असल्याने तिसऱ्यावेळी टाकलेला गिट्टीचा थर असा जागोजागी उघडा पडला आहे.