जालना : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या कुंडलिका, सीना या दोन्ही नद्या स्वच्छ व सुंदर करून नदीकाठी पर्यावरणपूरक वृक्षलागवड करता येणार आहे. कुंडलिका व सीना नद्यांच्या पुनरुज्जीवन व संवर्धनावर भर दिला जाणार असून, जिल्हा प्रशासन या कामी सर्व ते सहकार्य करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड यांनी दिले.
समस्त महाजन, घाणेवाडी जलसंरक्षण मंच, आनंद नगरी सेवाभावी संस्था व शंभर रुपये सोशल क्लबच्यावतीने कुंडलिका व सीना संरक्षण अभियानांतर्गत लोकसहभागातून झालेल्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पाहणी केली. कुंडलिका व सीना संरक्षण अभियान आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मागच्या तीन वर्षांत झालेले काम, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन तसेच नगर पालिका प्रशासनाचे योगदान याची माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतली. यावेळी घाणेवाडी जलसंरक्षण मंचचे रमेशभाई पटेल, समस्त महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई, आनंद नगरी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवरतन मुंदडा, उद्योजक घनश्याम गोयल, उद्योजक सुनील रायठठ्ठा, सुरेश केसापुरकर, शंभर रुपये सोशल क्लबचे उदय शिंदे, पालिकेचे अभियंता संजय वाघमारे, शोएब खान, नारायण मते, गणेश चांदोडे आदींची उपस्थिती होती.
फोटो