लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिल्याने ग्रामीण भागात आज भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शेतात काम नसल्याने आता रोजचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न गोरगरिबांपुढे येऊन ठेपला आहे. रोजगार हमीची कामे सरू करण्यासह जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील विविध गावांतून आलेल्या मजुरांनी दोन तास ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, लाल बावटा च्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सहभागी शेतमजुरांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदविला. मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारावरच रोखल्याने संतप्त झालेल्या मोर्चेकºयांनी पोलिसांना न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात धडक मारली. मजुरांचा रौद्र अवतार पाहून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य प्रवेश करणारा दरवाजा बंद करून पोलीस बंदोबस्त वाढविला होता.दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू होते. यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात विविध मागण्यासह प्राधान्याने गावांमध्ये रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी निवेदनात होती.
जालना जिल्हाधिकारी कचेरीत मजुरांचा दोन तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:15 AM